पुसद : पॅरीस येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवून या घटनेत सहभागी असलेले आणि त्यांच्या मोहरक्यांना पायबंद घालावा या मागणीचे निवेदन जमिअते-उलमा-ए-हिंद पुसद शाखेतर्फे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी सदर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, जमिअते-उलमा-ए-हिंद मागील आठ वर्षांपासून दहशतवादाविरुद्ध लढा देत आहे. आतापर्यंत देशभर २०० हून अधिक सभा घेऊन नागरिकांमध्ये जागरूती करण्यात आली. यात देशातील लाखो शांतताप्रिय लोकांनी सहभाग घेतला आहे. दहशतवादाच्या नावाखाली मुस्लिम आणि इस्लामला बदनाम करण्याचा प्रयत्न तसेच निरपराध लोकांना लक्ष्य करणाऱ्यांविरुद्ध आपला आवाज बुलंद केला आहे. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सरकारसोबत आमची संघटना असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांच्यावतीने नायब तहसीलदार जी.एम. राठोड यांनी स्वीकारले. यावेळी पुसद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे आदी उपस्थित होते. निवेदनावर जमिअते-उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना सैयद युनूस बुखारी, डॉ.रेहान खान, मोहम्मद सनी खान, मौलाना उमर, साकीब शहा, हाफिज लियाकत, हाफिज अकील आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. (प्रतिनिधी)
पॅरिस हल्ल्याविरूद्ध जमिअतेचे निवेदन
By admin | Published: November 20, 2015 3:01 AM