लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरण कुमरे यांनी नागपूर येथे भेट घेवून आदिवासी समाजाच्या विकासासाठी निवेदन सादर केले. या समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यांच्या विकासासाठी करावयाचे प्रयत्न यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याची विनंती त्यांना करण्यात आली. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पूर्वी असलेली आणि आता बंद करण्यात आलेली फेलोशीप पूर्ववत सुरू करावी, १९९५ चा बोगस जीआर रद्द करण्यात यावा, बोगस आदिवासींची घुसखोरी थांबविण्यासाठी कमिशन बसविण्यात यावे, १९७४ चा जमीन प्रत्यारोपणाचा कायदा देशपातळीवर सक्तीने राबविण्यात यावा, आदिवासी आश्रमशाळेचे ५० टक्के शहरीकरण करण्यात यावे, शबरी विकास महामंडळामार्फत आदिवासींना देण्यात आलेले कर्ज माफ करावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात येऊन मागण्यांसंदर्भात मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी अशोक मेश्राम व इतर अनेक उपस्थित होते.
आदिवासींच्या मागण्यांसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:22 AM