आर्णी (यवतमाळ) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्णी शाखेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला. ग्राहकांच्या खात्यातून रक्कम परस्पर गहाळ करण्यात आली. आता या ग्राहकांना बॅंकेकडून पैसे दिले जात नसल्याने मंगळवारी संतप्त खातेदारांनी आर्णी शाखेतील दैनंदिन कामकाज बंद पाडले.
जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला. खोट्या सह्या, बनावट नोंदी करून परस्पर रकमा काढल्या गेल्या. या प्रकरणी चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. व्यवस्थापक, रोखपाल व लेखापाल या तिघांना निलंबित तर एकाची सेवा समाप्त करण्यात आली. आर्णी शाखेचे गेल्या दहा वर्षाचे त्रयस्थ सीएमार्फत लेखापरीक्षण केले जात आहे. खात्यातून रक्कम परस्पर गहाळ होणे ही बॅंकेची जबाबदारी असल्याने बॅंकेने आमच्या रकमा पूर्ववत खात्यात जमा कराव्या, अशी फसवणूक झालेल्या खातेधारकांची मागणी आहे. पीक कर्जासाठी रक्कम ठेवलेल्या शेतकऱ्यांना ३१ मार्चनंतर व्याजाचा भुर्दंड बसू नये म्हणून बॅंकेने त्यांच्या खात्यात रक्कम जमा दाखवून पीक कर्जात वळती केली, मात्र त्यासाठी शर्ती-अटी घालण्यात आल्या. याच धर्तीवर इतर खातेदारांनीही रकमेची मागणी केली आहे. मात्र बॅंकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने खातेदार संतापले. कुणी आजारासाठी तर कुणी कौटुंबीक लग्न सोहळ्यासाठी बॅंकेत रक्कम ठेवली होती. मात्र तीच गहाळ झाल्याने संपूर्ण नियोजनावर पाणी फेरले गेले. बॅंक पैसे परत देत नसल्याने मंगळवारी काही खातेदारांनी आर्णी शाखेत व्यवहार बंद पाडले. या खातेदारांनी शांतपणे कर्मचाऱ्यांना काम बंद करण्यास सांगितले. आमचे पैसे परत द्या, निश्चीत तारीख ठरवून द्या असे म्हटले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी यवतमाळ मुख्यालयात संपर्क करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आर्णी पोलीस आर्णी शाखेत दाखल झाले.