पुसद : मुद्रण छपाईचा चुकीचा मुद्दा उपस्थित करुन आदिवासींची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही असा ईशारा पुसद येथे निघालेल्या आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाद्वारे देण्यात आला. या मोर्चात पुसद तालुक्यातील ग्रामिण भागातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाचे रुपांतर यशवंत रंगमंदिराच्या भव्य प्रांगणात सभेमध्ये झाले. तालुक्यातील आदिवासी यावेळी समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती. दुपारी १२ वाजता शिवाजी चौकातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व किनवटचे माजी आमदार भीमराव केराम, पंचायत समिती सभापती आशा पांडे, जिल्हा परिषद सदस्या आरती फुफाटे, जिल्हा परिषद सदस्य अरुण कळंबे, परशराम डवरे, गणेश र्इंगळे, आदिवासी प्रकल्प कार्यालय अध्यक्ष सुरेश धनवे, पंचायत समिती सदस्य प्रेम मेंढे, पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, नाना बेले, नामदेव इंगळे यांनी केले. विविध घोषणा देत आदिवासी बांधव सुभाष चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे यशवंत रंग मंदिरावर पोहोचले तेथे या मोर्चाचे सभेमध्ये रुपांतर झाले. सभेला प्रामुख्याने बिरसा मुंडा ब्रिगेडचे राष्ट्रीय प्रवक्ते भावना ईलपाजी, हिंगोलीचे सतीश पाचपुते, साहित्यिक माधव सरकुंडे यांनी संबोधित केले. यावेळी आदिवासी नेत्यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदनही देण्यात येऊन आपल्या मागण्यांबाबत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.निवेदनात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४२ अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्षेत्रासंबंधी सप्टेंबर १९५० रोजी राष्टपतींच्या पहिल्या आदेशात आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत संसदेने वेळोवेळी सुधारणा केलेल्या अनुसूचित जमातीच्या याद्या सुचिबद्ध केलेल्या असून त्यामध्ये धनगर अशी नोंद आढळत नाही. १९६० च्या प्रसिद्ध अनुसूचीमध्ये ओरॉन , धनका, धनगड अशी नोंद आढळते. त्यांचे क्षेत्र मेळघाट, गडचिरोली, सिरोंचा, केळापूर, वणी आणि यवतमाळ हे निर्धारीत होते. राज्य घटनेमध्ये स्पष्टपणे म्हटल्या गेले आहे की, नामसदृश जाती किंवा जमातींना मूळ जाती-जमातीच्या सवलती मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे एका राज्यातील लाभार्थी जात किंवा जमात दुसऱ्या राज्यात असेलच असे नाही. म्हणून शुद्धलेखनातील चुका काढणे हे घटनासमितीपुढील आव्हान आहे. आणि आदिवासींच्या आरक्षणामधली घुसखोरी खपवून घेणार नसल्याचे निवेदनामध्ये नमूद आहे. निवेदन देतेवेळी सखाराम इंगळे, संजय डुकरे, शशिकांत पांडे, रामदास भडंगे, संजय डुकरे, शशिकांत पांडे, मारोतराव वंजारे, शामराव व्यवहारे, श्रीराम अंभोरे, नारायण कऱ्हाळे, भगवान डाखोरे, ज्ञानेश्वर तडसे, विजय मळघणे, सतीश पाचपुते, अरविंद कुळमेथे, प्रा.माधव सरकुंडे, बाबाराव मडावी, एम.के.कोडापे, भावना ईलपाची, फकीर जुमनाके, राजेश ढगे, प्रा.गणेश माघाडे, रमेश उमाटे, नामदेव इंगळे, गजानन टारफे, भगवान खोकले, संदिप कोठुळे आदींची उपस्थिती होती. मोर्चाचे आयोजन बिरसा मुंडा ब्रिगेड व आदिवासी कर्मचारी संघटना पुसदच्या वतीने करण्यात आले होते. मोर्चामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये असलेले आदिवासी बांधव लक्ष वेधून घेत होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी बिरसा मुंडा ब्रिगेडचे पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, नाना बेले, गजानन भोगे, पंकज पारभे व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
पुसदमध्ये आदिवासींचा आरक्षण बचाओ मोर्चा
By admin | Published: August 09, 2014 11:57 PM