यवतमाळ : नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्हा बँकेमध्ये विविध खातेदारांनी ७१ कोटींच्या जुन्या नोटा जमा केल्या. या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेला संशय आल्याने त्यांनी नोटा स्वीकारल्या नाही. त्यांची तपासणी केली गेली. आता पुन्हा या नोटा नेमक्या कुणाच्या होत्या, त्यांच्याकडे त्या कुठून आल्या, याबाबत रिझर्व्ह बँक तपासणी करणार असल्याने या नोटांचे गूढ वाढले असून संशय कायम आहे. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांच्या कालावधीत ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले. जिल्हा बँकेच्या खात्यातही या नोटा जमा करण्यात आल्या. या सूचनेत बदल करीत अर्थमंत्र्यांनी हे पैसे न स्वीकारण्याच्या सूचना जिल्हा बँकेला त्यावेळी दिल्या होत्या. यामुळे जमा झालेल्या ७१ कोटी रूपयांच्या नोटा जिल्हा बँकेकडेच पडून आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या नोटा स्वीकारण्याचे अलीकडे जाहीर केले. मात्र या नोटा स्वीकारण्यापूर्वी खात्याची तपासणी करण्याचे आदेश दिले. मुळात या रकमेत संचालकांचा मोठा पैसा असल्याचा संशय केंद्र शासनाला आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचे पथक खात्याची तपासणी करणार आहे. जमा असलेल्या पैशावर जिल्हा बँक खातेदारांना व्याज देत आहेत. मात्र या व्याजाचा भुर्दंड जिल्हा बँकेला सोसावा लागत आहे. हे व्याज त्यांना शासनाकडून अद्याप मिळाले नाही. या संपूर्ण खात्याची तपासणी झाल्यानंतर हे प्रकरण निकाली निघेल. तोपर्यंत या पैशाचे व्याज बँकेला मिळणार नाही. यातून बँकेला पुढील काही महिने तब्बल अडीच ते तीन कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. (शहर वार्ताहर) जिल्हा बँकेत जमा करण्यात आलेले ७१ कोटी अद्यापही स्वीकारले गेले नाही. या प्रकरणात रिझर्व्ह बँकेची चमू तपासणी करणार आहे. लवकरच हे पथक यवतमाळात येणार आहे. - अविनाश सिंघम, सीईओ, जिल्हा बँक, यवतमाळ.
७१ कोटींवर रिझर्व्ह बँकेचा संशय कायम
By admin | Published: April 05, 2017 12:17 AM