जिल्हा मध्यवर्ती बँक : पुसदमधून ग्रीन सिग्नल, सर्व संचालकांची एकजूट यवतमाळ : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय ११ मेपर्यंत लांबणीवर पडला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळ सुमारे नऊ महिन्यांपासून कार्यरत आहे. या काळात बँकेतील नोकर भरती, साहित्य खरेदी, कंत्राट, कर्जप्रकरणे, अवाढव्य खर्च, नाममात्र नफा, पगारवाढ-बोनस आदी प्रकार गाजले. त्यातूनच विविध स्तरावर चौकशी समित्या गठित केल्या गेल्या. काही प्रकरणे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. त्यातून आतापर्यंत सुखरूप असलेल्या संचालकांना आता युती सरकारमध्ये मात्र अचानक कारवाईची कारवाईची आणि सर्वांनाच अपात्र ठरविल्यास सहकारातील राजकारण संपुष्टात येण्याची भीती वाटू लागली. या भीतीतूनच सर्व संचालकांनी एकजूट होऊन अध्यक्ष बदलविण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता अध्यक्षांमुळेच सर्व समस्या निर्माण होत आहे, शेतकरीही अध्यक्षांवरच नाराज आहेत अशा सबबी पुढे केल्या गेल्या. विशेष असे, गेल्या नऊ-दहा वर्षात बँकेत घेतल्या गेलेल्या बहुतांश निर्णयात ही संचालक मंडळी ‘वाटेकरी’ आहेत. सर्व संचालकांनी आपला निर्णय कळवून अध्यक्षांवर राजीनामा देण्यासाठी दबाव निर्माण केला आहे. अध्यक्षांनी राजीनाम्याचा चेंडू तूर्त आपल्या गॉडफादर नेत्यांच्या दरबारात टोलविला आहे. बुधवारी अध्यक्ष मनीष पाटील यांनी पुसदमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार मनोहरराव नाईक यांची भेट घेतली. अध्यक्षपद पाच वर्षांसाठी असताना दुप्पट कार्यकाळ मिळाल्याचे सांगत नाईक यांनी राजीनामा देण्याबाबत पाटील यांना सिग्नल दिल्याचे त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असलेले संचालक सांगत आहेत. आता मनीष पाटलांना प्रतीक्षा आहे ती विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या निर्णयाची. ते विदेशातून ११ मे रोजी परतणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यावरच पाटील राजीनाम्याचा निर्णय घेणार आहे. ( जिल्हा प्रतिनिधी) बँकेच्या नव्या अध्यक्षासाठी जिल्हा परिषद पॅटर्न मनीष पाटलांचे अध्यक्षपदावरून जाणे संचालक मंडळी जवळजवळ निश्चित माणत आहेत. त्यामुळे बँकेचा नवा अध्यक्ष कोण? याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. विविध निर्णयात वाटेकरी असलेल्या संचालकांना सरकारचे सुरक्षा कवच हवे असल्याने आगामी अध्यक्ष भाजपाच्या कोट्यातील होईल, असे मानले जात आहे. बँकेचा दीर्घ अनुभव असलेल्या एका संचालकाने ‘लोकमत’शी बोलताना, राजकारणात काहीही होऊ शकते, नेतेमंडळींच्या पोटात काय आहे, हे सांगता येत नाही, असे स्पष्ट करीत जिल्हा परिषदेतील भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या पॅटर्नचे स्मरण करून दिले.
अध्यक्षांचा राजीनामा पडला लांबणीवर
By admin | Published: May 05, 2017 2:15 AM