शिक्षकांच्या समस्येकडे दुर्लक्ष : शिक्षक आमदारांची बघ्याची भूमिका शिंदोला : वणी तालुक्यातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध ठामपणे उभे न राहता शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे शिक्षक आघाडीच्या सचिवासह सदस्यांनी आपले राजीनामे संघटनेच्या श्रेष्टीकडे पाठविले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३ सप्टेंबर २०१६ ला राबविण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेत वणी तालुक्यातील १७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेत १७ शिक्षकांपैकी १६ शिक्षकांना त्यांच्या मुळ कार्यस्थळांपासून २०० ते २५० किलोमीटर दूर अंतरावर समायोजनाचे आदेश जाणीवपूर्वक शिक्षण विभागाने दिल्याचा सदर शिक्षकांचा आरोप आहे. तसेच अनेक अतिरिक्त शिक्षकांना विनाअनुदानीत पदावर समायोजित करण्यात आले. समायोजन प्रक्रियेत अतिरिक्त शिक्षकांचा कोणत्याही प्रकारचा दोष नसताना त्यांचे तीन महिन्यांचे वेतन थांबविल्याचे काम शिक्षणाधिकाऱ्यांनी केल्याचाही आरोप आहे. सदर प्रक्रियेत शिक्षण विभागाने अनेक चुकीचे निर्णय घेतले. याबद्दल वणी तालुका शिक्षक आघाडीचे सचिव दिवाकर नरूले यांनी अनेकवेळा शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना लेखी स्वरूपात कळविले. मात्र सदर चुकीच्या समायोजन प्रक्रियेबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांसोबत काहिच न बोलता केवळ बघ्याची भूमिका घेतली. शेवटी नाईलाजास्तव जिल्ह्यासह वणी तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांवर झालेल्या अन्यायाची जबाबदारी घेऊन वणी तालुका शिक्षक आघाडीचे सचिव दिवाकर नरूले यांच्यासह सदस्य प्रदीप हुलके, रोहन मोडक, प्रकाश देवाळकर ज्ञानेश्वर दातारकर, श्रीकांत गोहोकार, विश्वंभर राऊत, विनोद झाडे, जयंत मगरे, सुरेंद्र बुच्चे, अनिल जांभुळे, सचिन झाडे, दिलीप कुबडे, रवींद्र चांदणे, प्रकाश कुटेमाटे यांनी शिक्षण आघाडीच्या कायम सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (वार्ताहर)
शिक्षक आघाडी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By admin | Published: February 05, 2017 1:00 AM