पूसद : शहरातील रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सोमवारी वसंतराव नाईक चौकात नगरसेवक साकिब शाह यांच्याद्वारे ‘भीक मांगो’ आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाला नागरिकांच प्रतिसाद लाभत आहे.
जनतेच्या कराच्या पैशातून जनसुविधा उभारण्याचे नियोजनाचे कर्तव्य पालिकेकडे असताना पालिका सुविधांबाबत कुंभकर्णी झोपेत आहे. पूसदकरांना सुविधा मिळत नसल्याने शहराची अवस्था खेड्यापेक्षाही वाईट झाली आहे. वसंतराव नाईक चौकापासून ते शनिमंदिरापर्यंत व वसंतराव नाईक चौकापासून ते मुखरे चौकापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पालिकेला जागे करण्यासाठी भीक मांगो आंदोलन सुरू करण्यात आले.
गोळा झालेल्या लोकवर्गणीतून रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे. नगरसेवक साकीब शाह यांनी सोमवारी वसंतराव नाईक चौकात रस्त्याच्याकडेला गळ्यात भीक मागो आंदोलनचे बॅनर घालून हातात माइक घेऊन पालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा पाढा वाचून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकही मोठ्या कुतुहलाने समस्या ऐकत होते.