लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तीनही लोकसभा मतदारसंघातील निकालाने आगामी विधानसभेत अनेकांचे राजकीय गणित बिघडविण्याचे संकेत दिले आहेत. हे निकाल कित्येकांसाठी आणि विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादीतील इच्छुकांसाठी धोक्याची घंटा वाजविणारे ठरले आहे.लोकसभेच्या तीनही मतदारसंघात अनपेक्षित निकाल पुढे आल्याचे मानले जाते. यवतमाळ-वाशिममध्ये वरवर सर्वत्र काँग्रेसचीच हवा पहायला मिळत होती. शिवसेना निवडून येईल असे कुणीही छातीठोकपणे सांगत नव्हते. उलट काँग्रेस कुण्या मतदारसंघात कशी प्लस राहील याचे गणित पक्ष कार्यकर्ते मांडताना दिसत होते. काठावरची लढत आहे, टफ फाईट होईल, मतांची मार्जीन अगदीच कमी राहील, असे सांगून संभ्रमही वाढविला जात होता. परंतु प्रत्यक्षात लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि अनेकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. जिल्ह्यातील अनेक चेहरे भाजप सोडून अन्य पक्षात जाण्याच्या मानसिकतेत होते. मात्र या निकालाने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यांच्यावर पक्षातच राहण्याची वेळ आली आहे. एका सेना नेत्याने तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची गेल्याच आठवड्यात भेट घेऊन पक्ष प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. त्याबाबत या नेत्याने दुजोराही दिला होता. मात्र निकाल लागताच हा नेता जैसे थेच्या मानसिकतेत आल्याचे सांगितले जाते. अशा अनेक चेहऱ्यांनी लोकसभेच्या निकालानंतर आहे तेथेच थांबण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मिळालेली एक लाख १७ हजार मतांची आघाडी खुद्द युतीतील नेत्यांनाच धक्का देणारी ठरली आहे. तार्इंच्या पराभवासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या युतीतील अनेकांना या आघाडीने गोंधळात टाकले आहे. जेथे ताई मायनस होतील असा अंदाज होता, नेमक्या तेथेच त्या प्लस झाल्याचे चित्र आहे. या आघाडीने आगामी विधानसभेसाठी इच्छुक अनेकांचे गणितच बिघडविले आहे.राळेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज माणिकराव ठाकरेंच्या साथीला असूनही सेनेला मिळालेली २८ हजार मतांची आघाडी आगामी विधानसभेत काँग्रेससाठी चिंता निर्माण करणारी ठरली आहे. त्या मतदारसंघात प्रवीण देशमुखांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीला माजी मंत्र्यांच्या गटातून सुरुवातीपासूनच विरोध होता असे सांगितले जाते. हा विरोध झुगारुन माणिकरावांनी देशमुखांची एन्ट्री करून घेतली. मात्र त्यांची एन्ट्री होताच माजी मंत्र्यांचे अनेक समर्थक निवडणुकीत बघ्याच्या भूमिकेत वावरल्याचे सांगितले जाते. गेल्या वेळी सेनेसोबत असलेले अनेक परिणामकारक चेहरे यावेळी काँग्रेस सोबत असल्याने तार्इंचा लीड कमी होईल असे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात तार्इंच्या लीडमध्ये वाढ झाली. ते पाहता एक तर त्या चेहऱ्यांची मतदारांमधील परिणामकारकता संपली असावी किंवा या चेहऱ्यांनी दादा गटाचा फंडा राबवून हिशेब चुकता केला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.पालकमंत्र्यांच्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला तब्बल ३७ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. ही आघाडी नेमकी कुणामुळे याच्या श्रेयाचा वाद भाजप व शिवसेनेत सुरू झाल्याचे सोशल मीडियावरून पहायला मिळते. सेनेला मिळालेल्या या मतांवरून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आतापासूनच या जागेवर दावा करणेही चर्चेतून का होईना सुरू केले आहे. सेनेला मिळालेल्या मतांच्या या आघाडीत सेनेऐवढेच भाजपलाही श्रेय दिले जात आहे. पालकमंत्र्यांची रणनीती उपयोगी पडल्याचे भाजप कार्यकर्ते सांगत आहेत.यवतमाळ मतदारसंघात काँग्रेस माघारण्यामागे पक्षांतर्गत गटबाजी हे प्रमुख कारण सांगितले जाते. काँग्रेसकडून विधानसभा लढविण्यासाठी अर्धा डझन चेहरे इच्छुक आहेत. त्यांना नेत्यांकडून तशी आश्वासनेही मिळाली आहेत. त्यामुळे सर्वच चेहरे कामाला लागले आहेत. मात्र त्यांच्यात पहिल्या-दुसऱ्या नंबरवर कोण यासाठी स्पर्धा आहे. काँग्रेसला मतांची आघाडी मिळाल्यास पहिल्या क्रमांकावरील इच्छुकाला संपूर्ण क्रेडीट मिळेल, असा विचार करून स्पर्धेतील इतरांनी जाणीवपूर्वक काँग्रेसला मायनस केल्याचे सांगितले जाते. अनेक इच्छुकांच्या गावात-बालेकिल्ल्यात चक्क शिवसेनेला लीड मिळाल्याच्या नोंदी आहेत. या मतदारसंघात काँग्रेसनेच काँग्रेसला पाडल्याचे सांगितले जाते.
दिग्रसमध्ये घटलेल्या लीडची जबाबदारी नेमकी कोण घेणार?शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मतांची प्रचंड आघाडी अपेक्षित होतीच. ही आघाडी मिळाली परंतु ती प्रचंड नव्हती. उलट २०१४ पेक्षा त्या आघाडीमध्ये साडेआठ हजार मतांची घट झाली. तेथेही सेनेला मिळालेल्या लीडवर सेनेसोबतच भाजपची मंडळीही दावा सांगत आहे. कालपर्यंत तळ्यात की मळ्यात करणाºया भाजपच्या मंडळींनी आता पक्षाचे लोकसभेतील यश पाहून एक पाऊल मागे घेत सेनेला मिळालेली लीड आमच्यामुळेच असा दावा करणे सुरू केले आहे. ते पाहता कालपर्यंत विधानसभेसाठी इच्छुक या भाजपच्या मंडळींवर युती झाल्यास चार महिन्यांनी सेनेचा प्रचार करण्याची वेळ येणार आहे. सेनेला मिळालेल्या लीडसाठी श्रेय घेणारी भाजपची ही मंडळी साडेआठ हजारांचा लीड कमी झाल्याचेही जबाबदारी घेणार का असा प्रश्न दिग्रस विधानसभा मतदारसंघात सेनेच्या गोटातून उपस्थित केला जात आहे.
पुसदने दिला कॉग्रेसला दगापुसद विधानसभा मतदारसंघाने काँग्रेसला दगा दिल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीने अनेक वर्षानंतर पहिल्यांदा बंगल्याबाहेर निघून काँग्रेसच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र दुर्दैवाने त्यांना काँग्रेसला मतांची आघाडी मिळवून देता आली नाही. राष्ट्रवादीची ही अवस्था आगामी विधानसभेच्या दृष्टीने पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. येथे सामाजिक वजन कमी झाल्याचे संकेत मिळत आहे. त्याच वेळी पुसद मतदारसंघात पहिल्यांदा मिळालेल्या मतांच्या आघाडीचे श्रेय घेण्यासाठी भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाºयांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळाले. हा लीड म्हणजे भाजप-सेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढलेले प्राबल्य याचे फलित मानले जाते.
आर्णी विधानसभेत काँग्रेसची मंडळी सपशेल फेलआर्णी, पांढरकवडा व घाटंजी तालुक्याचा समावेश असलेल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपचा ५७ हजारांचा लीड कायम राहिला. या लीडने काँग्रेससाठी आगामी विधानसभेत मोठी चिंता निर्माण केली आहे. भाजपला मिळालेल्या या लीडवरून काँग्रेसची तमाम नेते-पदाधिकारी मंडळी सपशेल फेल ठरल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या अनेक गावात भाजपला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या एकूणच पक्षनिष्ठा व प्रामाणिकपणावर संशय घेतला जात आहे. ‘किंगमेकर’ म्हणून वावरणाऱ्या मंडळीकडेही राजकीय दृष्ट्या साशंकतेने पाहिले जात आहे. भाजपला मिळालेल्या ५७ हजार मतांच्या आघाडीचे श्रेय आमदार राजू तोडसाम यांना दिले जात आहे. या आघाडीत काँग्रेसमधील केवळ ‘अर्थ’कारणासाठी ‘दोन्ही तबले वाजविणाऱ्या’ मंडळींचेही मोठे श्रेय असल्याचे चर्चिले जात आहे. भाजपच्या मतांची ही लीड पाहता काँग्रेसचा २०१४ चा छुपा पॅटर्न २०१९ मध्येही शंभर टक्के यशस्वी झाल्याचे मानले जाते. सुरेश धानोरकरांच्या सोबत फिरणारी काँग्रेसची मंडळी केवळ शरीराने साथीला असावी, मनाने दुसरीच कडे असावी असाही तर्क आर्णी विधानसभा मतदारसंघातील राजकीय गोटात लावला जात आहे. मात्र भाजपला मिळालेली ही लीड आगामी विधानसभेत काँग्रेसचे गणित बिघडविणार असे दिसते. ४१ हजाराने उमरखेडमध्ये सेनेच्या आशा पल्लवितलोकसभेच्या हिंगोली मतदारसंघात उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघाने यावेळी शिवसेनेच्या हेमंत पाटलांना भरीव साथ देत ४१ हजार मतांची आघाडी दिली आहे. येथेसुद्धा ही आघाडी नेमकी कुणामुळे याबाबत भाजप व सेनेत रस्सीखेच पहायला मिळते. भाजपच्या ताब्यातील या मतदारसंघात या आघाडीचे श्रेय भाजपला दिले जात असले तरी त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा असल्याचे सांगत सेना आगामी विधानसभेसाठी या जागेवर दावा करणार असल्याचे बोलले जाते. कारण सेनेचे इच्छुक अनेक वर्षांपासून येथे तयारीला लागले आहेत. युती झाल्यास बंड करण्याच्या मानसिकतेप्रत हे इच्छुक आले असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेला मिळालेल्या ४१ हजारांच्या या लीडने काँग्रेसमधील आगामी विधानसभेसाठी इच्छुकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यांच्यासाठी ही लीड राजकीय दृष्ट्या अडचणीची ठरली आहे. या मतदारसंघात आतापासूनच काँग्रेस मायनस असल्याचे संकेत मिळत आहे. त्याचवेळी लीडने सेनेचा ‘कॉन्फिडन्स’ वाढविला असून त्यांचा विधानसभेतील दावा आणखी मजबूत झाल्याचे मानले जाते. मात्र त्यांना त्यासाठी आधी भाजपशी दोन हात करावे लागणार आहे. या लीडने भाजपमधील उमेदवारीच्या रिपीटवर असलेले संशयाचे मळभ दूर झाल्याचेही मानले जाते.