यवतमाळ : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याविरोधात महसूल संघटना आक्रमक झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांच्याबाबत अपशब्द बोलून अपमानित केल्याचा तिवारींवर आरोप आहे. याविरोधात महसूल विभागाच्या सात कर्मचारी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. किशोर तिवारींचा निषेध नोंदवत संघटनांनी शुक्रवारी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तिवारींनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
किशोर तिवारी यांनी घाटंजी येथे कर्ज मेळाव्याबाबत जनसभा वजा बैठक घेतली. बैठकीची नियोजित वेळ सकाळी 11 ची असताना अध्यक्ष 1.30 वाजता सभास्थळी आल्याचा संघटनांचा दावा आहे. तहसीलदार कार्यालयीन काम असल्याने कार्यालयात होत्या. बैठकीसाठी नायब तहसीलदार यांच्यासोबत इतर अधिकार्यांना पाठवलं आणि मिशनचे अध्यक्ष आल्यानंतर त्याबाबत कळवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
या बैठकीत किशोर तिवारी यांनी महिला तहसीलदारांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप होते. याशिवाय नायब तहसीलदार यांनाही अपमानित केल्याचा आरोप तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केला आहे. एका तहसीलदाराला धमकीवजा फोन करतांनाचा किशोर तिवारी यांचा ऑडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. वारंवार होणार्या या अपमानामुळे महसूल विभागाच्या सर्व संघटनांनी दंड थोपटले असून, किशोर तिवारी यांचा निषेध नोंदवत शुक्रवारी बंद पुकारला आहे.
या संपात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, वाहनचालक, चर्तुर्थश्रेणी कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा समावेश आहे. सर्व संघटनांनी लेखी माफीनामा मागितला आहे. तो न दिल्यास पुढील आंदोलनाची दिशा शुक्रवारी ठरविणार असल्याचं सांगितलं.
किशोर तिवारींचं स्पष्टीकरण
“पीककर्ज वाटपाचा अहवाल विचारला तरी पूजा मॅडम या कार्यालयात बसून होत्या. त्यांनी नायब तहसीलदाराला पाठवलं. या मॅडम समाजसेवक, शेतकरी यांचा सतत अपमान करतात आणि प्रत्येक कामाला जीआर मागतात, अशा पत्रकारांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे पूजा मॅडमला आत्ताच बोलवा असा निरोप पाठवला. त्यातच पाच निराधार महिलांचे अनुदान बंद केल्याचा प्रकार समोर आला. यावेळी दुसऱ्या एक पूजा मॅडम आल्या आणि त्यांना दीनदयाल अंत्योदय योजनेची प्रगती विचारली. काहीही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रागाच्या भरात सर्व अधिकाऱ्यांना सुनावलं. पण कुणाचाही अपमान केलेला नाही,” असं स्पष्टीकरण किशोर तिवारी यांनी दिलंय.
दरम्यान, 30 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात आपण कोणत्याही आई-बहिणीचा अपमान केलेला नाही. या अधिकारी-कर्मचारी माझ्या मुलीसारख्या आहेत. तरीही त्यांची मनं दुखावली असतील तर विनाशर्त माफी मागतो. हा प्रकार समजल्यानंतर व्यथित होऊन पूजा मॅडम यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असंही किशोर तिवारी यांनी म्हटलंय. संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि आरोपांची शहानिशा करण्यासाठी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली समिती गठीत करावी. दोषी असल्यास माझ्याविरोध फौजदारी कारवाई करावी, असंही किशोर तिवारी यांनी म्हटलंय.