लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजी तहसीलदारांसह इतर दोघांना शिवीगाळ केले. या घटनेचे पडसाद शुक्रवारी राज्यभर उमटले. यवतमाळात महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. महिन्याभरात कारवाईची मागणी करणारे पत्र राज्यपालांना पाठविण्यात आले. यासोबतच किशोर तिवारी यांच्या बैठकींवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.गुरूवारी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे, पूजा केराम आणि योगिता वाघ या महिला कर्मचाऱ्यांना अत्यंत उर्मट शब्दात बोलले. शेकडो लोकांसमोर त्यांचा अपमान केला. या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, वाहन चालक, शिपाई, कोतवाल संघटनेने एकत्र येऊन बंद पाळला. यापूर्वीही किशोर तिवारी यांनी शासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भरसभेत अपमान केला.किशोर तिवारी यांच्या बैठका आणि सभांवर यापुढे बहिष्कार टाकण्याचा निर्णय महसूल कर्मचाºयांनी घेतला. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडे तक्रार नोंदविली जाणार आहे. या विषयाचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये १४ सदस्य आहेत. त्यामध्ये दोन महिला प्रतिनिधी, तहसीलदार ते कोतवालापर्यंतचे कर्मचारी सदस्य म्हणून नोंदविले गेले आहेत.स्थानिक तिरंगा चौकामध्ये पार पडलेल्या आंदोलनात तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे राज्य पदाधिकारी दिलीप झाडे यांच्या अध्यक्षतेखाली पोस्टल ग्राउंडवर सभेचे सूत्रसंचालन आशिष जयसिंगपुरे तर आभार अनिल राजूरकर यांनी मानले. महसूल संघटना अध्यक्ष गजानन टाके, पटवारी संघटना सचिव पवन बोंडे, मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष महादेव सानप, वाहन चालक संघटना अध्यक्ष अजय मिश्रा, चतुर्थ श्रेणी संघटनेचे विनोद उन्हाळे, सुनिल जुनघरे, यामिनी कोरे, कांचन डेरे, पूजा जामनिक, अमृता के दार आदी उपस्थित होते.जिभेच्या अनियंत्रित वापराने ‘देवाने धाडलेला गरिबाचा माणूस’ फेलकिशोर तिवारी यांच्या जिभेच्या अनियंत्रित वापर झाला. यामुळे देवाने धाडलेला गरिबाचा माणूस फेल झाल्याचे परखड मत महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक नंदकुमार बुटे यांनी व्यक्त केले. शासनाच्या योजना दिवसरात्र राबविणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सतत अपमान केला जातो. यामुळे शुक्रवारी त्याचे रूपांतर आंदोलनात झाले. महसुलातील अधिकारी, कर्मचारी, सर्व संघटनांनी एकत्र येऊन अन्यायाविरूद्ध संघर्ष करण्यासाठी महसूल अधिकारी कर्मचारी यांची समन्वय समिती शुक्रवारी स्थापन करण्यात आली. या समितीने राज्यपालांकडे तक्रार नोंदवली आहे. एक महिन्यात न्याय देण्याची मागणी केली. तूर्त हे आंदोलन स्थगित केले.किशोर तिवारी जनसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आले आहेत. त्यांनी महिलांना अपशब्दात बोलणे हा प्रकार निषेधार्ह आहे. त्यांच्याकडून भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये.- रवींद्र देशमुख, प्रमुख सल्लागार, महसूल संघटना, यवतमाळ
तलाठी ते तहसीलदार सारेच उतरले रस्त्यावरजिल्ह्यातील ६५० महसूल कर्मचारी, ७३० तलाठी, २२० मंडळ अधिकारी, २३ वाहनचालक, १५० चतुर्थश्रेणी कर्मचारी, ८५ नायब तहसीलदार, २१ तहसीलदार आंदोलनात सहभागी झाले होते.विविध संघटनांचा पाठिंबासर्व तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, मंडळ अधिकारी, तलाठी संघटना, महसूल कर्मचारी, महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी, महसूल वाहन चालक, लघुलेखक संघटना, उपजिल्हाधिकारी संघटना, भूमीअभिलेख संघटना आदींनी आंदोलनाला पाठींबा दिला.