लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरासह तालुक्यात सध्या डेंग्यू या कीटकजन्य आजाराने डोके वर काढले आहे. शहरातील ४५ ते ५० व्यक्तींचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. खासगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये दररोज विषाणूजन्य आजारांची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. बहुतेक रुग्ण पांढरकवडा, उमरी, यवतमाळ, नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांचा शासकीय आकडेवारीत समावेश नाही. शहरातील खासगी दवाखान्याच्या ओपीडीमध्ये दररोज सरासरी १० रुग्ण हे डेंग्यूचे आढळत आहेत. त्या हिशेबाने एकूण दवाखान्यातील रुग्णसंख्या शेकडोच्या घरात जाते. काही डॉक्टरांच्या स्वत:च्या घरात रुग्ण आढळले आहेत. नगर परिषदेने शहरात स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.पावसामुळे पाणी साचून राहिल्याने आणि डासांच्या प्रजननामुळे या आजारात वाढ होत आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूची साथ, त्यात भरीस भर शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी व त्यात निर्माण झालेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरल्याचे समोर आले आहे. नगर परिषदेची निष्क्रियता लक्षात घेता आगामी दिवसांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रभागांमध्ये धुरळणी (फॉगिंग) ला खो देत नगर परिषद कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. घरातील फ्रीज, कूलर, शोभिवंत फुलांची कुंडी, पाण्याची टाकी, तसेच अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. एडिस एजिप्ता या डासाने चावा घेतल्यास डेंग्यूची लागण होते. डेंग्यू किंवा मलेरिया झालेले अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल होतात. शहरातील काही खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. जीवघेण्या डेंग्यूचा धोका ओळखून नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेने वेळीच उपाययोजना करणे अपेक्षित असताना संबंधित विभाग कमालीचे निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे.
कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन - पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांना ब्रेक लावण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले; परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने, तसेच गावात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. कोविड ओसरताच शहरासह, ग्रामीण भागात डेंग्यू या कीटकजन्य आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.