लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी सहा, सोमवारी चार रुग्ण आढळले होते, तर मंगळवारी एकाच दिवसात ११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारानंतर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता २८ इतकी झाली आहे. यातील २४ जण जिल्ह्यातील तर चौघे बाहेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एकंदर ९४२ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यातील ११ पॉझिटिव्ह तर ९३१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७३ हजार चार इतक्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ७१ हजार १८८ नागरिक कोरोनामुक्त झाले, तर १७८८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. एकंदर सात लाख ८६ हजार ९०४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील सात लाख १३ हजार ८०१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९.२७ असून, दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर मंगळवारी १.१७ होता, तर मृत्यू दर २.४५ इतका आहे. दोन महिने रुग्णवाढ नियंत्रणात दिसत होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात चाचण्याही वाढलेल्या आहेत. त्यासोबतच पाॅझिटिव्ह अहवालही वाढले आहे. रविवारी सहा जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले तर सोमवारी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारीही तब्बल ११ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना नागरिक मात्र मास्क न घालता बाजारपेठेत फिरताना आढळत आहेत. ३१ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने सुधारित निर्देश जारी करून निर्बंध वाढविले आहे. मात्र जमावबंदीच्या काळातही सार्वजनिक ठिकाणी नागरिक फिरताना दिसत आहे. यातून कोरोना नियंत्रण नेमके कसे होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसऱ्या दिवशी दहा हजार विद्यार्थ्यांनी घेतली लस - सोमवारपासून जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी तब्बल आठ हजार २३८ विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला तर मंगळवारी दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद वाढला. मंगळवारी दहा हजार विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.