कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच शहरात डासांचा प्रकोप वाढत आहे. सतत अधेमधे बरसणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी डबके साचले आहे. यामुळे डासांची संख्या वाढत असून, शहरातील प्रत्येक भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. त्यामुळे आता शहरात संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. मागील वर्षापासून कोरोना संक्रमणाचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनामध्ये तीव्र ताप आणि कोरडा खोकल्यासह घशात दुखण्याची लक्षणे आहेत. डेंगूमध्येसुद्धा तीव्र ताप असतो. डेंग्यूवर आतापर्यंत कोणतीही लस निघालेली नाही. अशा चहूबाजूंनी निर्माण होणाऱ्या संकटामुळे डासांचा नायनाट करणे आवश्यक आहे. मागील वर्षी याचवेळेस डेंग्यू आजाराने शहरात डोके वर काढले होते. परंतु, प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्यामुळे शहरात डेंग्यूचा प्रकोप कमी होण्यास मदत झाली. परंतु, यावेळीसुद्धा डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी शहरवासीयांची मागणी आहे.
पांढरकवडा शहरात संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:25 AM