वाहतुकीचा खोळंबा : पुलावरून वाहले चार ते पाच फुट पाणी पारवा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पारवा परिसरातील नदी, नाल्यांना पूर गेला. वर्दळीच्या प्रमुख मार्गावरील वाहतूक यामुळे ठप्प झाली होती. शिवाय पारवा गावातील मोठा नालाही पूर्ण भरून वाहिला. पावसाचा जोर आणखी काही वेळ कायम राहिला असता तर गावात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला होता. मागील आठवडाभरापासून परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहात आहेत. शुक्रवारी जवळपास चार तास सतत मुसळधार पाऊस झाला. या परिसरातून वाहणारे नाले आणि नद्यांना पूर आला. वाघाडी नदीवर चार ते पाच फुट पाणी चढल्याने पारवा-उनकेश्वर मार्ग बंद झाला होता. पूर ओसरल्यानंतर रात्री १० वाजता वाहतूक सुरळीत झाली. आर्णीकडे जाणारी सर्व वाहने खोळंबली होती. नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे पारवा-पांढरकवडा, घाटंजी-पारवा या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. इंजाळा, ऐरणगाव येथील नाल्यांवर सहा ते सात फुट पाणी होते. झुली येथील नाल्यावरील पुलामुळे दोन ते अडीच तास वाहने थांबली होती. या पुरामुळे नदी काठच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. पारवा गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेला नालाही भरून वाहिला. या नाल्याची स्वच्छता झाली नसल्याने साधारण पावसानेही पूर्ण भरतो. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याचे पाणी गावात पसरणे सुरू झाले होते. पावसाचा जोर कायम राहिला असता तर गावात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली होती. (वार्ताहर)
पारवा परिसरातील नदी, नाले फुगले
By admin | Published: July 24, 2016 12:42 AM