अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : प्रचंड मोठी नदी गावाशेजारून वाहते. पूर्वी तीच तहान भावीत होती. मात्र आता नदीचे वाळवंटात रूपांतर झाले. परिणामी ‘नदी गावात, पाणी डोळ्यांत’, अशी स्थिती पैनगंगा नदीकाठावरील गावांची झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नदीत ठिकठिकाणी विहिरे खोदून महिला पाण्यासाठी पायपीट करीत आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून कधीकाळी बारमाही वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्राचे सध्या वाळवंटात रूपांतर झाले. इसापूर प्रकल्पासह अनेक लहान, मोठे बंधारे असलेल्या या नदीत खड्डे करून महिलांवर पाणी उपसण्याची वेळ आली. हंडाभर पाण्यासाठी महिलांची धडपड सुरू झाली. जीवनदायीनी असलेल्या नदी काठावरील किमान ५५ गावांमध्ये सध्या पाण्यासाठी सर्वांचीच भटकंती सुरू आहे. गावात नदी असताना पाणी मात्र बाया-बाप्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत आहे.दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होते. पैनगंगा नदी काठच्या किमान ५५ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसतात. मुरली, भांबरखेडा, तिवरंग, झाडगाव, हातला, दिवट, पिंंप्री, नागापूर, बारा, बेलखेड, कुपटी, बिटरगाव, चिंचोली, मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, दिघडी, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, गांजेगाव, सावळेश्वर, अकोली, पिंपळगाव, जेवली, मुरली, पैदा, टाकळी, बंदी, जवराळा, बोरी(वन), गाडी, सोनदाभी, मोरचंडी, मथुरानगर या नदी काठावरील गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागते.यंदा अपुºया पावसाने नदी लवकरच कोरडी पडली. परिणामी महिलांसह लहान मुलही भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकत आहे. मुरली येथे नदी पात्रात लहान-लहान खड्डे करून त्यात जमा होणारे पाणी भरण्यासाठी महिलांची दिवसभर गर्दी असते. पहाटे नदी पात्रात जाऊन खड्डा करायचा, तेथे घरातील लहान मुलांना बसवून खड्ड्यात जमा झालेले पाणी कळशीत भरायचे. चार-पाच कळशी भरल्या की घरातील दुसरी महिला नदीवर येते अन् भरलेल्या कळशी घेऊन जाते. हा क्रम दिवसभर सुरू असतो.पाणी शेवटपर्यंत पोहोचतच नाहीमुरली येथे ज्या ठिकाणी खड्ड्यातून महिला पाणी भरतात, त्याच पात्रात ५० फुटांवर भव्य असा कोल्हापुरी बंधारा आहे. मात्र त्यात पाणीच नाही. या नदीवर पुसद तालुक्यात इसापूर येथे मोठा प्रकल्प आहे. काठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली की, दरवर्षी प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित पाणी नदीत सोडले जाते. मात्र त्यातून प्रकल्प परिसरातील काही गावांचीच तहान भागते. नदी पात्रातून अखेरच्या गावापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने इतर गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य कायम असते.इसापूर प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी या गावांसाठी नदी पात्रात सोडले जात आहे. विहीर अधिग्रहण, टँकरसाठी संबंधित गावांतील ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार कारवाई सुरू आहे. ठराव आल्याशिवाय प्रशासन पुढील कारवाई करू शकत नाही. पाणीटंचाई निवारणार्थ नागरिकांनाही सहकार्य करावे.- स्वप्निल कापडणीसउपविभागीय अधिकारी, उमरखेड
नदी गावात अन् पाणी डोळ्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 9:59 PM
प्रचंड मोठी नदी गावाशेजारून वाहते. पूर्वी तीच तहान भावीत होती. मात्र आता नदीचे वाळवंटात रूपांतर झाले. परिणामी ‘नदी गावात, पाणी डोळ्यांत’, अशी स्थिती पैनगंगा नदीकाठावरील गावांची झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नदीत ठिकठिकाणी विहिरे खोदून महिला पाण्यासाठी पायपीट करीत आहे.
ठळक मुद्दे५५ गावांची फरपट : पाण्यासाठी पैनगंगा नदीत ठिकठिकाणी विहिरे