मारेगाव : रस्त्याचे मजबुतीकरण करताना त्या रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करा आणि नंतर रस्ता मजबुतीकरण करा, असा स्पष्ट आदेश आहे. मात्र जिल्हा परिषदेंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या रस्ता रूंदीकरणात अतिक्रमण वाचवून मजबुतीकरण होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सध्या तालुक्यात गोंडबुरांडा ते गोधणी या २० किलोमीटर रस्त्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग ांतर्गत मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या २० किलोमीटर रस्त्यावर ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता गेला, त्यापैकी काही शेतकऱ्यांनी कुंपन करून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. आता नव्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागान्तर्फे रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू असताना ही अतिक्रमणे काढून रस्ता मजबुतीकरण करणे गरजेचे होते. तसे आदेश असतानाही रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधितांनी अतिक्रमण न काढताच ‘तडजोड‘ करून रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. २० किलोमीटरचा हा रस्ता ज्या गावातून गेला, त्या गावातही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तथापि अतिक्रमण काढणे आमचे काम नाही, अशी भूमिका बांधकाम विभागाने घेतली आहे. त्यामुळे जागेवरच रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू असल्याने या रस्ता बांधकामात मोठा घोळ होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शासकीय नियमाप्रमाणे अतिक्रमण काढून रस्ता मजबुतीकरण होेणे गरजेचे आहे. मात्र अतिक्रमणधारकांना अभय देत थातूर-मातूर कामे उरकविल्या जात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढून नियमाप्रमाणे काम न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोंडबुरांडा, गोंधणी, मदनापूर, धामणी येथील नागरिकांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
अतिक्रमणे न काढताच रस्त्याचे बांधकाम
By admin | Published: March 01, 2015 2:09 AM