लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : नेर तालुक्यातील सोनखास येथे दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला सिमेंट रस्ता उखडला आहे. गिट्टी बाहेर येत आहे. अल्पकाळात या रस्त्याची वाट लागल्याने कामाचा दर्जा स्पष्ट झाला आहे.ठक्करबाप्पा योजनेतून ग्रामपंचायतीने रस्ता बांधला. या कामासाठी कंत्राटदाराने नाल्याची रेती वापरली. विहिरीवरील काळा दगड फोडून गिट्टी म्हणून टाकण्यात आला. याशिवाय इतर साहित्यही सुमार दर्जाचे वापरले. काम सुरू असताना नेर पंचायत समितीच्या कुठल्याही अधिकाऱ्याने फिरकून पाहण्याचेही सौजन्य दाखविले नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी रस्ता कामाची घाई करण्यात आली. या कामाची तपासणी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रत्ना देवीदास येलके, सुनील इंगोले, कलेश्वर रिंगणे आदींनी केली आहे.
सोनखासचा रस्ता दोन महिन्यात उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 9:48 PM