लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चंद्रपूरवरून शिंदोलामार्गे आदिलाबादकडे जाणाऱ्या राज्य मार्गाची साखरा ते शिंदोलादरम्यान, चाळणी झाली आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हे समजायला येत नाही. रस्त्याने वाहने चालविणे धोकादायक ठरल्याने चंद्रपूर आगाराने यामार्गे मुकूटबनला जाणारी बस बंद केली आहे. त्यामुळे घुग्घूस येथे शिक्षणासाठी ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची पंचाईत झाली असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ आली आहे.चंद्रपुरवरून घुग्घूस-शिंदोला-मुकूटबनमार्गे तेलंगणा राज्याला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. या मार्गाने चंद्रपूर आगाराच्या बसेस मुकूटबनला जातात. मात्र याच मार्गावर वेकोलिच्या कोळशाच्या खाणी असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणारे अवजड ट्रक सतत धावत असतात. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे. या मार्गाला वेकोलिचा शाप असल्याने वेकोलिनेच हा मार्ग ठणठणीत करावा, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनही केले होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले. प्रशासनाच्या नरमाईच्या भूमिकेमुळे वेकोलि प्रशासन निष्ठूर बनले आहे. हा मार्ग अवजड वाहतुकीमुळे वारंवार फुटत असल्याने वेकोलिनेच दुरूस्तीचे काम करावे, अशी मागणी आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग वारंवार या एकाच रस्त्यावर खर्च करण्यास असमर्थ आहे. यावर्षीच्या सततच्या पावसाने मार्गावर जलकुंड तयार झाले आहे. या कुंडात पाणी भरून असल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. वेकोलिने या रस्त्याची दुरूस्ती त्वरित सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकास, तालुका प्रमुख गणपत लेडांगे, ललित लांजेवार, सुधीर थेरे, शशीकांत नक्षणे यांची उपस्थिती होती. वेकोलिने ५ सप्टेंबरपर्यंत दुरूस्ती न केल्यास शिवसेना दळणवळण पूर्णत: बंद पाडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.वर्धा नदीवरील पूलही झाला कमकुवतयाच मार्गावर वर्धा नदीवर वेकोलिने पूल बांधला. मात्र या पुलाचे बांधकामही निकृष्ट झाल्याने धोकादायक ठरला आहे. त्याच्या बांधकामाची गुणनियंत्रण पथकाकडून चौकशी व्हावी व पुल धोकादायक सिद्ध झाल्यास वेकोलिला नवीन पूल बांधण्यासाठी बाधित करावे, अशीही मागणी केली जात आहे.
घुग्गुस-शिंदोला रस्त्याची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:37 PM
वेकोलिच्या कोळशाच्या खाणी असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणारे अवजड ट्रक सतत धावत असतात. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे.
ठळक मुद्देअवजड वाहतुकीचा परिणाम : वेकोलिकडून रस्त्याची दुरूस्ती करण्यास टाळाटाळ