पुसद : तालुक्यातील मोहा (ई) येथे अवघ्या सहा महिन्यांतच नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता उखडला आहे. त्यामुळे कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
मोहा येथे ऑगस्ट २०२० मध्ये दलितवस्तीच्या निधीतून तीन लाख रुपयांचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे शासनाच्या निकषानुसार व इस्टिमेटनुसार न करता, सहा महिन्यांतच उखडून गेला. आता त्याच रस्त्यावर थातूरमातूर गट्टू अंथरूण बिल काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाच लाख रुपयांच्या निधीचा वापर न करता अपहार केला जाऊ नये, या दृष्टीने गटविकास अधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली. तथापि, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.
एकाच रस्त्यावर दोनदा काम कसे व का, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. मोहा यथे अनेकदा निधीचा वेगळ्या पद्धतीने अपहार केल्याचा आरोप तक्रारकर्ते बळवंत मनवर यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी आठ दिवसांत न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.