सुरज नौकरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव(देवी) : राज्य सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या नावाखाली बांधकाम मजुरांची आर्थिक लूट होत आहे. गावखेड्यात पोहोचून निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यासाठी सुटाबुटातले टोळके सज्ज झाले आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयांचाही वापर केला जात आहे. मजुरांची दिशाभूल करून रक्कम वसूल केली जात असल्याचे सांगितले जाते.महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध २८ कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. याचा लाभ घेण्यासाठी १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगारांना मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ४ आॅगस्टपर्यंत विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. यासाठी नोंदणी फी २५ रुपये आणि पाच वर्षांकरिता दरमहा एक रुपया याप्रमाणे ६० रुपये असे एकूण ८५ रुपये शुल्क भरायचे आहे.नोंदणीसाठी आलेल्या काही लोकांकडून ग्रामपंचायतीशी संपर्क साधला जातो. दवंडी देऊन नोंदणीसाठी कागदपत्र घेऊन बोलाविले जाते. आसेगाव(देवी) येथे झालेल्या अभियान कार्यक्रमात लोकांना वेगळाच अनुभव आला. महामंडळाने एकूण ८५ रुपये शुल्क जाहीर केलेले असताना याठिकाणी आलेल्या लोकांनी ६०० रुपयांची मागणी केली. बाभूळगाव पंचायत समितीत ८५ रुपयात नोंदणी केली जाते. तुम्ही ६०० रुपये कसे घेता, असा प्रश्न केला असता अभियानातील लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय बाभूळगाव, यवतमाळ येथे कॅम्पमधून नोंदणी केल्यास योजनांचा लाभ मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.गावकऱ्यांनी याठिकाणी नोंदणी केली नाही. मात्र लगतच्या काही गावांमध्ये या प्रकाराचे काही लोक बळी ठरले असल्याची माहिती आहे. यावली, डेहणी या गावांमध्येही असा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. सरपंच, ग्रामसचिव यांच्याकडे सदर प्रकाराविषयी तक्रार करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात जागा तेवढी उपलब्ध करून देण्यात आली. इतर बाबींविषयी माहिती नाही, असे सांगण्यात आले. संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी यासंदर्भात लोकांना माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पंचायत समितीमध्येच नोंदणी करता येते. यासाठी निर्धारित केवळ ८५ रुपयांचाच भरणा करावा लागतो. याची पावतीसुद्धा दिली जाते. त्यामुळे बांधकाम मजुरांनी ही दक्षता घेणे आवश्यक आहे.
मजुरांना लुटण्यासाठी टोळके गावखेड्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:25 PM
राज्य सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या नावाखाली बांधकाम मजुरांची आर्थिक लूट होत आहे. गावखेड्यात पोहोचून निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यासाठी सुटाबुटातले टोळके सज्ज झाले आहे.
ठळक मुद्देदिशाभूल : अटल विश्वकर्मा सन्मान योजना, जादा रकमेची मागणी