यवतमाळ : सध्या राज्यात ईडी, आयटी, एनसीबी यांसारख्या स्वायत्त संस्थांचा केंद्र सरकार राजकीय हत्यार म्हणून वापर करीत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्धही हा प्रयोग करण्यात आला, असा आरोप आमदार रोहित पवार(rohit pawar) यांनी केला.
आमदार रोहित पवार यांच्या पुसद भेटीत नाईक बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी व लोकांच्या मनावर खोट्या गोष्टी बिंबविण्यासाठी हा प्रयोग होत असेल, तर उद्या या स्वायत्त संस्थांवर कोण विश्वास ठेवणार ? हे राजकीय हत्यार वापरून लोकांपुढे चुकीचे पर्सेप्शन तयार करण्याची भाजपची ही खेळी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार रोहित पवार यांनी स्वायत्त संस्थांची पहिली माहिती भाजपचे किरीट सोमय्या यांना कशी मिळते? असा प्रश्न उपस्थित केला. या संस्था धाडी टाकतात. नंतर त्यात काहीही सापडत नाही; परंतु भाजप अशा रीतीने प्रपोगंडा करते की, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. बिहार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चित्रपट अभिनेता सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी असाच संभ्रम निर्माण करण्यात आला. चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या मुलावरील एनसीबी धाड प्रकरणातही लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हीच नीती वापरण्यात आल्याची चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर भाजपला बोलण्याचा हक्क नाही. हा संपूर्ण विषय केंद्राचा आहे. संसदेच्या अधिवेशनात एकाही भाजप खासदाराने हा प्रश्न मांडला नाही. संभाजीराजे यांनाही खासदार संजय राऊत यांच्या हस्तक्षेपानंतर बोलण्याची संधी देण्यात आली, असे त्यांनी सांगितले. भाजपवर हल्ला चढवताना ते म्हणाले, राज्याचे हक्क केंद्राने काढून घेतले. केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या ‘फेडरलायझेशन अमेंडमेंट’ने हा हक्क काढण्याचा निर्णय घाईत पारित केल्यानंतर भाजप गप्प बसले. नंतर आरक्षणाची टिमकी वाजविण्यासाठी पुढे आले. भाजपाची ही बेरकी चाल आहे, अशी टीका त्यांनी केली.
ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजप वेगवेगळ्या सभा घेत आहे. हा नुसता आपुलकीच्या देखाव्याचा फुगा आहे. केंद्राने ओबीसींचा २०१४ ला संग्रहित झालेला एम्पिरिकल डाटा राज्याला का दिला नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ओबीसींचा स्ट्राँग होल्ड आहे. ओबीसींची टक्केवारी वाढू शकते व त्याद्वारे भाजपला धक्का बसू शकतो, अशी भीती असल्यानेच भाजपची तयारी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या तोडफोडीचे राजकारण वाढले असून या राजकीय गोंधळात विकासाचे प्रश्न मागे पडले आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मनोहरराव नाईक, आमदार इंद्रनील नाईक, नगराध्यक्ष अनिताताई नाईक, ययाती नाईक, आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीने ४२ लाख हेक्टरचे नुकसान
राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानभरपाईसाठी केलेली मदत तुटपुंजी आहे का?, यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी, केंद्राच्या दुजाभावाची चिरफाड केली. नैसर्गिक संकटात केंद्राच्या एनडीआरएफचा मदतीचा वाटा मोठा असतो. गेल्यावेळी गुजरातमध्ये वादळ होताच पंतप्रधानांनी दुसऱ्याच दिवशी दौरा करून एक हजार कोटींची मदत केली. मात्र, महाराष्ट्रात अतिवृष्टी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीला दोन महिने लागले.
राज्यात ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले. केंद्राची मदत आली नाही. ही बाब पंतप्रधानांना ठाऊक नसेल, तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्राकडे का मांडली नाही, असा सवाल त्यांनी केला. राज्याला जीएसटीचे ३५ हजार कोटी मिळाले नाहीत, पंधराव्या वित्त आयोगाचे केंद्राने पैसे दिले नाहीत, असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले.