दिग्रसचे संजय देशमुख आघाडीवर : दारव्हा, यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदारही स्पर्धेत यवतमाळ : मिनी एसपी म्हणून ओळखल्या जाणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वर्णी लावून घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात दिग्रसचे ठाणेदार संजय देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. प्रल्हाद गिरी यांची बदली झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पद रिक्त आहे. जिल्ह्यातील जुने अधिकारी आणि नव्याने बाहेरुन बदलून आलेल्या अधिकार्यांचा या पदावर डोळा आहे. त्यासाठी सर्वांनीच आपआपल्या परीने लॉबिंग सुरू केली आहे. कुणी राजकीय मार्गाने तर कुणी प्रशासकीय मार्गाने फिल्डींग लावली आहे. त्यात सध्या तरी दिग्रसच्या संजय देशमुख यांनी आघाडी घेतल्याचे सांगितले जाते. त्यांच्यासाठी अमरावतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका निलंबित नेत्याने आपले वजन वापरल्याची माहिती आहे. या नेत्याला पोलीस प्रशासनाकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याने संजय देशमुख यांची एलसीबीतील वर्णी निश्चित मानली जात आहे. याशिवाय दारव्हा आणि यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदारही जोर लावून आहेत. यवतमाळ ग्रामीणच्या ठाणेदारांनी तर साहेबांसोबतच्या आपल्या जुन्या कार्यकाळाचा हवाला देत आपली वर्णी निश्चित असल्याचा दावा केला आहे. याशिवाय एका मंत्र्यांनी आपल्या मर्जीतील ठाणेदारासाठी थेट महानिरीक्षकांशी संपर्क साधल्याचे पोलीस वतरुळात बोलले जाते. मात्र महानिरीक्षकांनी ठाणेदारांच्या नियुक्त्या या एसपींच्या अधिकारातील बाब असल्याने आपण त्यात हस्तक्षेप करणार नाही, चुकीचे होत असेल तरच ते निदर्शनास आणून देऊ, अशी भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले. या मंत्र्यांच्या शिफारसीवरून यापूर्वी पांढरकवडा येथे ठाणेदार नेमण्यात आले होते. मात्र त्यांना आता नियंत्रण कक्षात बसविले गेले. यवतमाळ ग्रामीणच्या ठाणेदाराला एलसीबीसाठी येथील जुन्या लॉबीचे पाठबळ असल्याचीही चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या कारभारावर पुसद, वणी, पांढरकवडा येथील ठाणेदार नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यांना वाहतूक शाखा प्रमुखांचा आपल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप नको आहे. आठवडाभरापूर्वी पांढरकवडा ठाणेदार व वाहतूक पोलीस निरीक्षकात याच कारणावरून वाद झाल्याचे सांगितले जाते. वाहतूक पोलीस निरीक्षक विरुद्ध अन्य प्रमुख ठाणेदार असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
स्थानिक गुन्हेशाखेसाठी रस्सीखेच
By admin | Published: June 07, 2014 1:57 AM