यवतमाळ: अभियोग्यता परीक्षेला चार महिने लोटूनही पवित्र पोर्टल सुरू होत नसल्याने बेरोजगार अस्वस्थ आहेत. मात्र राज्यातील दहा जिल्हा परिषदांनी बिंदूनामावलीमध्ये आरक्षित पदांबाबत घोळ घातल्याने रिक्त पदांचे चित्र स्पष्ट होणे कठीण झाले आहे. सर्व जिल्हा परिषदांचा आढावा घेताना ही बाब प्रधान सचिवांसह शिक्षण आयुक्तांच्या निदर्शनास आली. त्यामुळे आता आरक्षित पदांचा घोळ संपवून रिक्त पदांची सुधारित माहिती आयुक्तांनी मागविली आहे.
पवित्र पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरतीची तयारी प्रशासनाच्या स्तरावर सुरू आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शुक्रवारी ३० जून रोजी राज्यातील सर्व उपसंचालक, सीईओ, शिक्षणाधिकारी यांची व्हीडिओ काॅन्फरन्स घेतली. यावेळी शिक्षण विभागाचे आणि ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवही उपस्थित होते. फेब्रुवारी-मार्चमध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. १५ जूननंतर शिक्षकांची संचमान्यता झाल्यानंतर नवीन भरतीसाठी पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्रोफाईल व प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा दिली जाणार होती. परंतु, अद्यापही राज्यातील रिक्त पदांची निश्चित आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध झालेली नाही. याबाबत व्हीसीमध्ये आढावा घेण्यात आला. परंतु, नांदेड, यवतमाळ, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या दहा जिल्हा परिषदांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बिंदूनामावलीत गफलत झाल्याचे यावेळी पुढे आले. त्यामुळे आता अचूक बिंदूनामावली करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
रोस्टरबाबत काय आहेत आक्षेप?
- - विविध जिल्हा परिषदांमध्ये खुल्या बिंदूवर दर्शविलेल्या पदांबाबत तक्रारी आल्याने २९ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रामविकास विभागाने चौकशी समिती नेमली होती.
- - जुन्या बिंदूनामावलीत मागास प्रवर्गात दर्शविलेल्या उमदेवारांना नवीन बिंदूनामावलीत खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शविले गेले.
- - सीईटी-२०१० मध्ये मागास वर्गात निवड झालेल्या उमदेवारांना २०१७ मध्ये बिंदूनामावली अद्ययावत करताना खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शविले.
- - काही कर्मचाऱ्यांची माहिती सापडत नाही असा शेरा मारून त्यांना खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शविले गेले.
- - सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचीही नावे बिंदूनामावलीमध्ये समाविष्ट करण्यात आली.
- - वस्तीशाळेतील निमशिक्षकांना सामावून घेताना रिक्तपदावर न घेता खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शविले गेले.
- - या घोळामुळे आता खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता लक्षात घेता रिक्तपदांची अचूक माहिती मागविण्यात आली आहे.
शिक्षक भरती होणार आहे. परंतु सध्या काही लोकांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. रिक्त पदांबाबत शुक्रवारी प्रधान सचिव आणि आयुक्तांनी व्हीसी घेतली. अचूक बिंदूनामावली विभागीय आयुक्तांकडून तपासून ७ जुलैपर्यंत सादर करायची आहे. - डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ