अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या संकटात भीतीचा आडोसा घेऊन सर्वसामान्यांना लुटण्याचा प्रकार औषध विक्रेत्यांकडून केला जात आहे. शासनाने केवळ ४९ रुपये इतका दर निश्चित केला असताना शहरात हा मास्क कुठे १००, कुठे १५० तर कुठे २५० रुपयांना ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. शासन निर्णयाप्रमाणे यवतमाळात कोणत्याही मेडिकल स्टोअरने मास्कच्या दरपत्रकाचा फलक लावलेला नाही. गंभीर म्हणजे मास्कवर एमआरपी नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. शिवाय मास्कचे बीलही मिळत नसल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, असे खुद्द अन्न व औषध प्रशासनाचे म्हणणे आहे.
मी तर मुद्दलमध्येच विकत आहेइंदिरा गांधी मार्केट परिसरात मेडिकल स्टोअरमध्ये एन-९५ मास्क १२० रुपयापासून १५० रुपयापर्यंत विक्री केला जात आहे. तीन पदरी व दोन पदरी प्रकारातील मास्क येथे उपलब्धच नाही. तर प्रीस मास्क या ब्रॅन्डवर चक्क २१४ रुपयांची प्रिंटेड प्राईज आहे. मात्र मी हा मास्क फक्त मुद्दलमध्ये म्हणजे १५० रुपयांना विकत असल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यातही ईअर लुप्स आणि हेड लुप्स मास्कच्या किंमती कमी अधिक आहेत.
स्वस्त सुविधा केंद्रातही महागाई सिव्हील लाईन परिसरातील तीन-चार मेडिकल स्टोअरमध्ये एन्-९५ मास्क १२५ ते २५० रुपयांना विक्री केला जात आहे. विशेष म्हणजे यात स्वस्त सुविधा केंद्राचाही समावेश आहे. तेथे तीन पदरी मास्क १० रुपये किंमतीला दिला जात आहे. तर दोन पदरी मास्क उपलब्धच नाही. या परिसरात दवाखान्यांची संख्या अधिक असल्याने येथून मास्कचा उठावही अधिक आहे. मात्र कुठेही दरपत्रकाचा थांगपत्ता दिसला नाही.
सरकारच्या किमतीत आमचा तोटायवतमाळच्या चर्च रोड परिसरात तीन ते चार मेडिकल स्टोअरमध्ये एन-९५ मास्क १२० ते १५० रुपयांना उपलब्ध आहे. मात्र येथील जेनेरिक स्टोअर चालकाने वेगळीच व्यथा मांडली. सरकारची किमत खूप कमी आहे. त्यापेक्षा आमची पर्चेस प्राईजही जास्त आहे. मग आम्ही तोट्यात मास्क विकायचे का? असा प्रश्न उपस्थित करीत आम्ही जुने मास्क संपल्यानंतर नवीन स्टाॅकच मागविला नाही, अशी व्यथा या दुकानदाराने व्यक्त केली.
.. म्हणून कारवाई करता येत नाहीमहागात विकला जाणारा जुना स्टाॅक असावा. केएन-९५ मास्कचा शासन निर्णयात उल्लेख नसल्याने त्यावर आमचे नियंत्रण नाही. शिवाय मास्क ड्रगमध्ये मोडण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूत मोडते. त्यामुळे या संदर्भात आम्हाला कारवाई करता येत नाही. - मनीष गोतमारे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, यवतमाळ