संजय भगत
महागाव : कोरोनामुळे शाळेत विद्यार्थीच नसतानाही हंगामी वसतिगृह दाखवून महागाव, पुसद, उमरखेड या तीन तालुक्यात ७० लाख रुपयांचा निधी उधळण्यात आला. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे १५ एप्रिलच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य शिवाजीराव देशमुख सवनेकर यांनी चौकशी समितीची मागणी करताच सभापती अनिता चव्हाण यांनी समिती नेमली. मात्र प्रकरण रफादफा करण्यासाठी काही मुख्याध्यापक सभापती व सदस्यांकडे येरझारा मारु लागले आहेत. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल अडकिने यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
वेणी आणि राहूर येथील हंगामी वसतिगृह संबंधित मुख्याध्यापकांनी मध्यस्थांना चालविण्यासाठी दिले होते, अशी माहिती आहे. अन्य गावातील वसतिगृहांबाबत खुद्द गावकऱ्यांनाच माहिती नाही. बहुतांश विद्यार्थी सधन घरातील असल्याचे आढळून आले. मात्र त्यांचे पालक स्थलांतरित म्हणून दाखविण्यात आले. या माध्यमातून शासकीय निधीची लूट केली गेली, अशी शंका व्यक्त होत आहे. कारवाईची गरज आहे.
पुसद, महागाव, उमरखेडमध्ये असा झाला खर्च
पुसद तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे एक लाख ७२ हजार, बान्सी ४ लाख ७५ हजार ९६६, जेवली पाच लाख ७७ हजार, दहीवड एक लाख ५४ हजार, मुंगशी चार लाख ९०हजार, सावरगाव बंगला तीन लाख २८ हजार, बोरी इजारा दोन लाख १७ हजार, जवळा चार लाख ९४ हजार, उडदी एक लाख ६३ हजार, उमरखेड तालुक्यातील नागापूर दोन लाख, पिंपळदरी तीन लाख २३ हजार, चिरकुटा एक लाख ६७ हजार, महागाव तालुक्यातील गुंज सहा लाख ३८ हजार, राहूर पाच लाख ८५ हजार, करंजी चार लाख ८५ हजार, बोरी इजारा पाच लाख ६४ हजार, वेणी बु. सहा लाख रुपये, कातरवाडी चार लाख १६ हजार असा तीन तालुक्यात ७० लाखांचा खर्च ३१ मार्चपर्यंत करण्यात आला.
कोट
हंगामी वसतिगृहाबाबत महागाव पंचायत समितीच्या १५ एप्रिल रोजीच्या मासिक सभेत चर्चा झाली. त्यानंतर चौकशी समिती गठित करण्यात आली. समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई प्रस्तावित केली जाईल.
- मयूर अंदीलवाडे
गटविकास अधिकारी, महागाव.