पारवा (जि. यवतमाळ) : राेजगार हमी योजनेच्या कामाची माहिती, माहिती अधिकार कायद्याद्वारे मागविणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना घाटंजी तालुक्यातील पारवा येथे सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी ठेकेदारासह चौघांना अटक केली आहे.
पारवा येथील अनिल देवराव ओचावार (३८) याचे झेरॉक्स सेंटर असून आरटीआय कार्यकर्ता म्हणूनही तो काम करीत होता. रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास त्याला घरून बोलावून नेऊन दगाफटका करण्यात आला. सोमवारी सकाळी तलावाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या उकीरड्यावर त्याचा मृतदेह आढळून आला.
अनिल ओचावार याने त्याच्या पत्नीच्या नावाने माहिती अधिकार टाकून सन २०१९-२० व २०२०-२१ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाची माहिती पारवा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मागितली होती. याच कारणावरून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनिल ओचावार याला रात्री १२.३० वाजताच्या सुमारास दानिश शेख इसराईल (२४) याने घरून बोलावून नेले होते. मीटिंगचे कारण सांगितल्याने पत्नीनेही त्याला जाण्यास होकार दिला. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेहच आढळून आला. कंत्राटदार विजय नरसिमलू भाषणवार (३८), जावेद मौला काटाटे (३५), दानिश शेख इसराईल (२४) व सुमित शंकर टिप्पणवार (२७, रा. पारवा) यांनी संगनमत करून अनिलचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनिलच्या गळा, छाती आणि पोटावरही तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. याप्रकरणी त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरून या चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पांढरकवडा येथे शवचिकित्सेनंतर अनिलच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पारव्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी या प्रकरणाची कारवाई पार पाडली.
पोलीस अधीक्षक पारवात दाखल
अनिल ओचावार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही काम करीत होता. खुनाच्या घटनेमुळे या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ हे सोमवारी पारव्यात दाखल झाले होते. अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, संजय पुज्जलवार, सायबर सेलचे अमोल पुरी, टोळीविरोधी पथकाचे हेमराज कोळी आदी उपस्थित होते. पारवाचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी या प्रकरणाचा अगदी काही तासात छडा लावला.