यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये रोजगार निर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, या हेतूने अडीचशे एकरवर विमानतळ उभारण्यात आले. मात्र, रिलायन्स सोबतच्या करारामुळे मागील १४ वर्षांपासून हे विमानतळ धूळ खात आहे. राज्य शासनाची उदासीनता या विमानतळाला भोवली असून कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कॅन्टीन इमारतीसह कंट्रोल टॉवर इमारतीचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. २१०० मीटरवरील रनवे उखडल्याने आजूबाजूच्या गावातील जनावरे आता येथे चराईसाठी आणली जात आहेत.
नागपूरसारख्या आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावर असलेल्या विमानतळाला लगतचे पर्यायी विमानतळ म्हणून यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळाची उभारणी करण्यात आली. यासाठी तब्बल ११४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करून विमानतळासाठी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कॅन्टीन इमारत, कंट्रोल टॉवर बिल्डींग, टर्मिनल बिल्डींग, टॅक्सी वे, ॲप्रोल एरिया, वॉचमन केबिन, पॅनल रुम, पंप हाऊस, बीटूमेन रोडस् तसेच वॉटर सप्लायची सुविधा निर्माण करण्यात आली. विमानतळामुळे सर्वाधिक आणि दर्जेदार कापूस पिकविणाऱ्या यवतमाळची ओळख राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल तसेच त्या माध्यमातून येथील उद्योग व्यवसायाला गती मिळून आदिवासी बहुल असलेल्या जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीस लागतील अशी अपेक्षा होती.
दरम्यानच्या काळात २००९ मध्ये या विमानतळाची देखभाल दुरुस्ती तसेच आधुनिकीकरण करण्यासाठी अनिल अंबानी यांच्या रिलायन्ससोबत औद्योगिक विकास महामंडळाने करार केला व विमानतळाचे ९५ वर्षांसाठी रिलायन्सकडे हस्तांतरण केले. तेव्हापासून म्हणजे मागील १४ वर्षांपासून या विमानतळाचे कामकाज ठप्प झाले आहे. मात्र, परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने रिलायन्सच्या काहीही हालचाली सुरू नाहीत, दुसरीकडे १४ वर्षांपासून कोट्यवधींच्या मालमत्तेचे मातेरे होत असतानाही राज्य शासन मूग गिळून गप्प असल्याचे विदारक चित्र आहे.
सिग्नल देणारी इमारत जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर
मागील १४ वर्षांपासून यवतमाळच्या या विमानतळावर कसलीही विकास कामे झाली नाहीत. उलट हवाई सेवा बंद झाल्याने, आहे त्या यंत्रणेची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. विमानतळाच्या निर्मितीनंतर येथील धावपट्टीचा विकास करून ती १३०० मीटरवरून २१०० मीटरपर्यंत वाढविण्यात आली. सध्या हा रनवे अनेक ठिकाणी उखडल्याचे दुर्दैवी चित्र आहे. वॉच टॉवरच्या इमारतीचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून विमानतळावरील विमानाला सिग्नल देणारी इमारतही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.
कर्मचारी निवासस्थान, कॅन्टीन इमारतीला खंडराचे स्वरूप
विमानतळ परिसरातील एका भागात कर्मचारी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. मात्र विमानसेवाच ठप्प असल्याने येथे कोणीही निवासाला नाही. पर्यायाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ही निवासस्थाने आज मोडकळीस आली आहेत. विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला कॅन्टीन इमारत आणि सुरक्षा रक्षकांची चौकी आहे. मात्र या दोन्ही इमारतींच्या खिडक्या आणि दरवाजे गायब झाले आहेत. परिसरात झाडी झुडपे वाढल्याने या इमारतीकडे जाणेही धोक्याचे झाले आहे. अशीच स्थिती विमानतळावरील ॲप्रोल एरिया, पॅनल रुम, पंप हाऊससह इतर सुविधांची आहे.