आरिफ अली ।लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आणि चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय आॅक्सिजनवर आहे. वरिष्ठांची अवकृपा असल्याने या रुग्णालयाची ‘प्रकृती’ दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आधीच डॉक्टर कमी असताना एकाला प्रतिनियुक्तीवर अमरावती जिल्ह्यात देण्यात आले आहे.पावसामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यात शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज ५०० ते ६०० रुग्ण असतात. ३० ते ४० जण उपचारार्थ दाखल असतात. किमान दोन प्रसूती होतात. सद्यस्थितीत याठिकाणी डॉ. प्रकाश चिमणानी व डॉ. सागर काटकर हे सेवा देत आहेत. अधीक्षक डॉ. लीना मुसळे यांची सध्या सेवा लाभत असली तरी त्या काही दिवसानंतर प्रसूती रजेवर जाणार आहेत. या रुग्णालयासाठी डॉक्टरांची सहा पदे मंजूर आहेत. एक अधीक्षक, वर्ग दोनचे तीन वैद्यकीय अधिकारी आणि शालेय पथकाचे दोन वैद्यकीय अधिकारी, अशी पदे भरली गेली आहेत. शालेय पथकाचे डॉक्टर रुग्णवाहिकेसोबत जातात. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांमधून एक डॉ. नीलेश सोळंके यांना अमरावती जिल्ह्याच्या हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना प्रतिनियुक्ती देताना येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड याचा काहीही विचार केला गेला नाही. उपसंचालक आरोग्यसेवा अकोला यांनी त्यांना प्रतिनियुक्ती दिली आहे. दीड महिन्यांपासून डॉ. सोळंके यांच्या जागेवर दुसरा डॉक्टर दिला नाही. त्यांचे वेतन मात्र बाभूळगाव येथून होत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेला प्रकार नगरपंचायत पदाधिकाºयांनी जिल्हा शल्य चिकित्सक तरंग तुषार वारे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्यापुढे अनेक प्रश्न मांडण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, उपाध्यक्ष चंद्रकांत परचाके, गटनेते श्रीकांत कापसे, कृष्णा ढाले, शिवसेना तालुका प्रमुख वसंत जाधव, नगरसेवक नईम खाँ मनवर खाँ, शब्बीर खाँ आदी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची गैरसोय होऊ नये, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयच ‘आॅक्सिजन’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:42 PM
शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आणि चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय आॅक्सिजनवर आहे. वरिष्ठांची अवकृपा असल्याने या रुग्णालयाची ‘प्रकृती’ दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
ठळक मुद्देवरिष्ठांचीही अवकृपा : आधीच तुटवडा, त्यातही डॉक्टर प्रतिनियुक्तीवर