मारेगाव : येथील ग्रामीण रूग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासल्यामुळे रूग्णांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे़ रूग्णालयातील विविध गैरसोयींमुळे रूग्ण त्रस्त असतानाच रूग्णालयातील बेडवर टाकायच्या बेडसीट धुवायला कुणीच मिळत नसल्याने उघड्या गादीवरच रूग्णांवर उपचार करावे लागतात़ येथील ग्रामीण रूग्णालयात विविध समस्या निर्माण झाल्या आहे़ मात्र त्यांच्या निराकरणासाठी आरोग्य विभागाकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही़ आता पावसाळ्यात रूग्णांच्या संख्येत वाढ होते़ दूषित पाण्यामुळे जंतू संसर्ग आजार मोठ्या प्रमाणात होतात़ रात्री-अपरात्री आजारी रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी भरती केल्याशिवाय पर्याय नसतो़ परंतु येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या काही महिन्यांपासून स्वत:च आजारी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, स्वच्छता गृहाची कमतरता, औषध वितरणाला नसलेले कर्मचारी, पाण्याचा अभाव, खाटांचा अभाव यामुळे हे रूग्णालय रूग्णांसाठी डोकेदुखी ठरले आहे़गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रूग्णालयातील बेडसीटा धुवायला महिलाच मिळत नसल्याने बेडसीटा धुतल्याच गेल्या नसल्याचा प्रकार उघडकीस आला़ त्याच बेडसीट अनेक रूग्णांसाठी वापरल्या जातात किंवा बेडसीटविनाच रूग्णांना खाटेवर झोपवून उपचार केले जात आहे़ त्यामुळे रूग्णांना जंतू संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे़ (शहर प्रतिनिधी)
ग्रामीण रूग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले
By admin | Published: July 22, 2014 12:04 AM