जंगले झाली विरळ : दगडी कोळशाचा वापर, लाकडांसाठी पायपीट, ग्रामीण भागात सिलिंडर पोहोचलेच नाहीवणी : पावसाळ्यात इंधनाची सोय व्हावी म्हणून ग्रामीण महिलांची सरपणासाठी भटकंती आहे. देशात एलपीजी गॅसच्या वितरणाचे जाळे पसरलेले असले, तरी गरिबीमुळे ग्रामीण महिलांना अद्याप चूल पेटविण्यासाठी सरपणाची गरज असते. सकाळ-सायंकाळी चूल पेटविण्यासाठी ग्रामीण महिलांना दिवसभर वणवण भटकून सरपण गोळा करावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते.देशातील नागरिकांना आता ‘अच्छे दिन‘ची प्रतीक्षा आहे. तथापि ३० टक्के जनता अद्यापही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना प्रचंड आटापिटा करावा लागतो. केंद्र व राज्य शासनाने गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ खऱ्या गरजूंना मिळत नाही, अशी नेहमीच ओरड होते. शासनाने गरिबांसाठी अंत्योदय धान्य योजना सुरू केली. यात अतिशय माफक दरात गरिबांना धान्य मिळते. तथापि धान्य शिजविण्यासाठी मात्र अखेर ग्रामीण महिलांना सरपणाचाच सहारा घ्यावा लागतो. अद्याप ग्रामीण भागात सिलिंडर पोहोचलेच नाही. ग्रामीण भागात केवळ मोजक्याच कुटुंबाकडे गॅस सिलिंडर आहे. अन्न शिजविण्यासाठी इंधन म्हणून गॅस, रॉकेल, सरपण व दगडी कोळशाचा वापर केला जातो. सध्या देशातील ७० टक्के घरांत एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचले आहे. मात्र अद्यापही किमान ३० टक्के कुटुंब इंधन म्हणून रॉकेल व सरपणाचा वापर करत आहे. शहरात बहुतांश घरांत गॅस आहे. कुणाकडे स्टोव्ह आहेत. शहरात सरपणाची उपलब्धता नसते. त्यामुळे सिलिंडर अथवा स्टोव्ह नसलेल्या कुटुंबात रॉकेल व दगडी कोळसा वापरला जातो. वणी परिसरात दगडी कोळसा सहज उपलब्ध होत असल्याने अनेक कुटुंबात या कोळशाचा पाणी गरम करणे आणि शेगडी लावून स्वयंपाकासाठी वापर केला जातो. वणी परिसरात दगडी कोळसा सहज उपलब्ध होतो. अनेक खाणींतून हा कोळसा कोलडेपो अथवा रेल्वे सायडींगवर पोहोचतो. यातून अनेकदा कोळशाची तस्करीही होते. आत्ताही शिरपूर, निळापूर मार्गावर काही ठिकाणी वाहनातून कोळसा उतरविला जात असल्याच्या खुणा आढळून येतात. खाणीलगतच्या गावामध्ये स्वयंपाकासाठी कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तथापि दगडी कोळसा पेटविल्याने हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यातून सारवण्यासाठी आता काही कुटुंबातील महिला सरपणासाठी झाडेझुडपे शोधतात. ग्रामीण भागात तर बहुतांश कुटुंब इंधन म्हणून लाकडी सरपण व शेणाच्या गोवऱ्यांचाच अजूनही वापर करतात. उन्हाळ्यात हे इंधन गोळा केले जाते. सरपण गोळा करण्याची जबाबदारी महिलांवरच असते. परिणामी ग्रामीण भागातील अनेक महिला उन्हातान्हात काट्या-गोट्यातून वणवण भटकून सरपण व जनावरांचे शेण गोळा करतात. प्रसंगी मोलमजुरी बुडवून, कामधंदा सोडून महिलांना रानावनात सरपणासाठी भटकावे लागते. झाडावर कुऱ्हाडीचा प्रहार करून लाकडे तोडावी लागतात. तोडलेली लाकडांची मोळी डोक्यावर वाहून आणावी लागते. ग्रामीण भागात जनावरांचे शेण शेतीसाठी खत म्हणून उपयोगी पडते. मात्र नाईलाजाने त्याच्या गोवऱ्या बनवून त्या इंधन म्हणून महिलांना वापराव्या लागतात. (कार्यालय प्रतिनिधी)
सरपणासाठी ग्रामीण महिलांची भटकंती
By admin | Published: May 23, 2016 2:31 AM