गुन्हेगारी वर्तुळ हादरले : रिव्हॉल्वर, तलवारीचा वापर, स्वीकृत नगरसेवक ताब्यातयवतमाळ : यवतमाळातील प्रमुख गुन्हेगारी टोळ्यांमध्ये असलेल्या वर्चस्वाच्या लढाईतून कुख्यात गुंड, काँग्रेसचा माजी नगरसेवक प्रवीण दत्तूजी दिवटे याचा निर्घृण खून करण्यात आला. सहा ते आठ जणांनी रिव्हॉल्वर, तलवारी, चाकूचा वापर करून प्रवीणला संपविले. स्वीकृत नगरसेवक बंटी जयस्वाल याच्या टोळीने हा हल्ला केल्याची फिर्याद प्रवीणची मुलगी सृष्टी हिने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यावरुन बंटी तसेच जुग्या महाराज यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. स्टेट बँक चौक ते वाघापूर मार्गावरील बांगरनगर स्थित मंगलशांती अपार्टमेंटमध्ये प्रवीण दिवटेचे वास्तव्य आहे. त्याच इमारतीत खाली त्याचे कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी सकाळी ९ वाजता सशस्त्र हल्ला चढविण्यात आला. प्रवीणच्या गाडीचा (क्र. एम.एच-२९-४१४१) टायर पंक्चर झाल्याने निशांत चपरिया व मयूर देसाई हे टायर दुरुस्त करण्यासाठी गेले होते. नेमकी हीच संधी साधून प्रवीण दिवटेच्या डोळ्यात मिरची पूड फेकून सशस्त्र हल्ला चढविण्यात आला. त्याच्यावर रिव्हॉल्वरमधून सहा गोळ्या झाडण्यात आल्या. यातील चार गोळ्या छातीत शिरल्या. तलवार, चाकू या सारख्या धारदार शस्त्राचे डझनावर वार करण्यात आले. या हल्ल्याचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला कार्यालयातील सफाई कर्मचारी मोनू बाजड याला हल्लेखोर आपल्या वाहनात सोबत घेऊन गेले. अद्यापही त्याचा थांगपत्ता नाही. मयूर व निशांत हे परत आल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले. या दोघांनी व कुटुंबियांनी प्रवीणला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. रिव्हॉल्वरचे काडतूस, मोठ्या प्रमाणात मिरची पावडर, शस्त्रे, चाकूची केस, मोबाईल, घड्याळ आदी साहित्य घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले. स्वीकृत नगरसेवक बंटी जयस्वाल, शाम जयस्वाल (दोघे रा. छोटी गुजरी, यवतमाळ), विशाल दुबे, रोहित जाधव, शत्रू आदींची नावे फिर्यादीमध्ये नमूद आहे. बंटी आणि जुग्या महाराजला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी ‘लोकमत’ला दिली. याशिवाय दत्त चौकातील एका अल्पवयीनालासुद्धा चौकशीत घेण्यात आले आहे. प्रवीणवर रविवारी अंत्यसंस्कार होणार आहे. पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रवीणच्या खुनाची वार्ता शहरात वाऱ्या सारखी पसरली. तरुणांनी वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्या घरासमोर प्रचंड गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. राजकीय आखाड्याचे स्वप्न भंगलेप्रवीण राजकारणात जम बसविण्याच्या प्रयत्नात होता. यापूर्वी तो काँग्रेसचा नगरसेवक राहिला आहे. सध्या त्याची पत्नी उषा दिवटे नगरसेविका असून शहर महिला काँग्रेसची अध्यक्षही आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रवीणने मोर्चेबांधणी चालविली होती. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याची भेटही घेतली. मात्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच विरोधी गुन्हेगारी टोळीने प्रवीणला संपविले.टोळीच्या अस्तित्वावरच घाला गेल्या कित्येक वर्षांपासून शहरातील दोन प्रमुख टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होती. कधी प्रवीणच्या तर कधी विरोधी टोळीची सरशी व्हायची. यावेळी मात्र टोळीचा म्होरक्या असलेल्या प्रवीणचा खून करून या टोळीचे अस्तित्वच संपविण्याचा प्रयत्न त्याच्या विरोधकांनी केल्याचे दिसून येते. पोलिसांची डोकेदुखी वाढणार प्रवीणच्या खुनाने यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारी आणि या टोळ्यांमधील वर्चस्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांची डोकेदुखी आता आणखी वाढणार आहे. विदर्भाबाहेरही नेटवर्क प्रवीणने गुन्हेगारी वर्तुळात विदर्भातच नव्हे तर मुंबई-पुण्यापर्यंत आपले नेटवर्क वाढविले होते. हे नेटवर्क येथेच खुंटावे आणि अनेक वर्षांपासूनच्या संघटित गुन्हेगारीला लगाम बसावा अशी पोलिसांची अपेक्षा आहे. या नेटवर्कची पुन्हा कुणी सूत्रे सांभाळू नये, म्हणून पोलीस प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा वॉच आहे. (कार्यालय प्रतिनिधी) हल्ल्याचे तीन प्रयत्न फसलेप्रवीण दिवटेवर यापूर्वी हल्ल्याचे तीन वेळा प्रयत्न झाले. त्याच्यावरील पहिला हल्ला नेर मार्गावरच्या एका ढाब्यावर झाला होता. त्याला यवतमाळ न्यायालयातील तारखेवरून अमरावती कारागृहात नेत असताना हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र तो पोलीस बंदोबस्तात असल्याने हे प्रकरण अधिकृतपणे रेकॉर्डवर आले नव्हते. त्यानंतर यवतमाळ कारागृहाच्या प्रवेशद्वारावर प्रवीणवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. परंतु देशीकट्ट्यातून ऐनवेळी गोळीच सुटली नाही. तिसरा हल्ला त्याच्या आठवडीबाजार येथील घराबाहेर झाला होता. त्यावेळी गोळी झाडली मात्र सुर्दैवाने तो बचावला होता. परंतु शनिवारी झालेल्या चौथ्या हल्ल्यात त्याचा गेम झाला. घटनास्थळावरील एकूण स्थिती, हल्लेखोरांची संख्या, त्यांच्याकडील शस्त्रे आणि प्रवीणच्या शरीरावरील जखमा पाहता यावेळी हल्लेखोर प्रचंड तयारीनिशी आल्याचे दिसून येते.
टोळीयुद्धातून प्रवीण दिवटेचा खून
By admin | Published: August 28, 2016 12:03 AM