लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथून महानगरात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासावर नागरिकांचा आतापर्यंत विश्वास होता. मात्र नाशिक दुर्घटनेनंतर प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिवहन विभाग अक्षरश: सामान्य नागरिकांच्या जिवाचा लिलाव करीत असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. प्रवासी क्षमता ३० असताना तब्बल ५५ प्रवासी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असल्याचे उघड झाले आहे. हा अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रकार परिवहन विभागाच्या संमतीनेच सुरू असल्याचे पुढे आले आहे. ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटांचा अक्षरश: लिलाव केला जातो. सणासुदीच्या काळात तर मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे वसूल केले जातात. एकीकडे ही मनमानी असताना प्रवासी सुरक्षिततेकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष केले जाते. क्षमतेच्या दुप्पट-तिप्पट प्रवासी कोंबून १० ते १५ तासांचा प्रवास करण्यास भाग पाडले जाते. प्रवासाची पर्यायी साधने नाहीत, ही बाब ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना चांगली ठाऊक आहे. यातूनच प्रवाशांच्या जीविताशी खेळणारे चक्र सुरू झाले आहे. परिवहन विभागाने प्रवासी वाहतुकीची सुरक्षा वारंवार तपासणे आवश्यक आहे. मात्र आजतागायत एकाही ट्रॅव्हल्सला अपवादानेही अतिरिक्त प्रवासी भरल्याबाबतचा मेमो देण्यात आलेला नाही. नाशिक दुर्घटनेत जखमी झालेले व ठार झालेल्या प्रवाशांपैकी केवळ ३० जणांनाच वाहन विमा कंपनीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित २५ जणांना झालेल्या दुखापती व जीवितहानीची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आपले आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या परिवहन विभागाने १२ जीवांचा बळी दिला आहे. त्यामुळे या चौकशीत स्थानिक अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी. ट्रॅव्हल्स मालकांकडून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. चालक व वाहकाने रस्त्याने अतिरिक्त प्रवासी भरले, असे बेजबाबदारीचे उत्तर दिले जात आहे. या प्रकरणात फौजदारी संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, असेही विधिज्ञांकडून सांगितले जात आहे.
नाशिक अपघातात जिल्ह्यातील मृतांची संख्या झाली तीन - नाशिक येथे झालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातात अज्ञात मृतांची ओळख पटविणे सुरू आहे. शनिवारी अजय कुचनकर (१६) रा. मांगरुळ, ता. मारेगाव याची ओळख पटली होती. रविवारी आलेल्या यादीत पुसद येथील सुरेश लक्ष्मण मुळे या मृताची ओळख पटली आहे. तर यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथील हरी तुकाराम भिसनकर (२४) या युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यासाठी त्याच्या पत्नीला बोलविण्यात आले. मात्र तिलाही जळालेला मृतदेह ओळखता आला नाही. आता डीएनए चाचणीद्वारे संशयित मृतदेह हरीचाच आहे काय हे निश्चित केले जाणार आहे. तूर्त तरी शासकीय रेकाॅर्डप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हरी तुकाराम भिसनकर याच्याबाबतची चौकशी सुरू आहे. त्यात तथ्य आढळल्यास त्यालाही मृत जाहीर केले जाईल.