हा रस्ता गावाचा मुख्य रस्ता आहे. गावकऱ्यांना या रस्त्याने ये-जा करावी लागते. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांना हाच रस्ता जोडतो. अंगणवाडी केंद्र, सहकारी बँक, सरकारी रेशन केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, बसस्थानक, दूध संकलन केंद्रसुद्धा याच रस्त्यावर आहे.
या रस्त्याला गावामध्ये दोन ठिकाणी धोक्याचे वळण आहे. अंगणवाडी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, बँक ग्राहक, शेतकरी, शेतमजूर, गावातील गुरेढोरांना हाच मुख्य रस्ता असल्यामुळे येणे-जाणे करावे लागते. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हा रस्ता गावातून असल्यामुळे वाहतूक व वर्दळ वाढली. वारंवार अपघाताच्या घटना घडतात. २०१८ मध्ये बस व दुचाकीचा अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. त्यावेळी प्रशासन व नागरतंमध्ये संघर्ष झाला होता.
गावातून गेलेला घाटंजी ते पांढरकवडा मार्ग सुमारे ४० वर्षांपूर्वी १९७८ ते १९७९ मध्ये केवळ २५ फूट रुंदीचा तयार झाला होता. दुष्काळी काम म्हणून या रस्त्याची निर्मिती झाली होती. नंतर १९९० मध्ये रस्त्याचे डांबरीकरण होऊन पांढरकवडापर्यंत रस्ता जोडण्यात आला. २०१० मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने गावातून गेलेल्या रस्त्याला बायपास मार्गाचा पर्याय न करता याच रस्त्याचे दुपदरीकरण केले. त्यावेळी रस्त्याची रुंदी वाढल्याने रस्त्यालगतची जागा व मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले होते. सध्या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे.
बॉक्स
ग्रामसभेने पारित केला ठराव
गावातून या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास वाहतूक व वर्दळ वाढेल. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल. रस्त्याच्या काठावरील रहिवासी नागरिकांचे जागा व मालमत्तेचे नुकसान होईल. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी साखरा (खुर्द) या गावातून गेलेल्या या रस्त्यासाठी बायपास रस्ता तयार करावा, अशी मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतीने तसा ग्रामसभेचा सोचा ठराव सादर केला आहे.