यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर आणि पैनगंगा या दोन अभयारण्यातील अनेक कर्मचाऱ्यांना गेल्या १५ ते २० वर्षांपासून प्रादेशिक विभागात बदलीची प्रतीक्षा आहे. मात्र दरवर्षी त्यांचा हिरमोड होतो आहे. यवतमाळ जिल्ह्यात या दोन अभयारण्यात टिपेश्वर, उमरखेड, बिटरगाव आणि खरबी हे चार वनपरिक्षेत्र आहे. तेथे शंभरावर वन कर्मचारी तैनात आहे. मात्र यातील अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून वन्यजीव क्षेत्राबाहेर प्रादेशिक वन विभागात बदल्या झालेल्या नाहीत. या बदल्यांसाठी या वन कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या वन कर्मचाऱ्यांना अभयारण्यात नेमणूक देऊ नये, असे आदेश आहे. मात्र त्यानंतरही सेवानिवृत्तीवरील कर्मचाऱ्यांना अभयारण्यात नेमणुका दिल्या जात आहे. तर तरुणतूर्क वन कर्मचाऱ्यांना प्रादेशिक विभागात नेमले जाते. वन खात्यात अभयारण्यात नेमणूक झाल्यास बहुतांश कर्मचारी आर्थिक आणि राजकीय बळावर परस्परच या बदल्या रद्द करून घेतात. अभयारण्याऐवजी सागवान तस्करीतून वरकमाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक वनविभागात हे कर्मचारी सोईच्या ठिकाणी आपली नियुक्ती करून घेतात. पर्यायाने नवे कर्मचारी अभयारण्यात नोकरीसाठी येत नाहीत आणि जुन्यांना वर्षानुवर्षे होऊनही अभयारण्याबाहेर प्रादेशिक विभागात नोकरी करण्याची संधी मिळत नाही. पूर्वी या अभयारण्याचा कारभार अकोला येथून चालत होता. मात्र आता पांढरकवडा येथे स्वतंत्र वन्यजीव विभाग सुरू करण्यात आला असून तेथे उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे पद मंजूर करण्यात आले आहे. मात्र अभयारण्यात अनेक जागा रिक्त आहेत. खरबी येथील विशेष सेवेचे वन परिक्षेत्र अधिकारी पद रिक्त आहे. वन कार्यालयांमध्ये लिपिकवर्गीय यंत्रणा नाही. शासनाच्या मनाईनंतरही नाईलाजाने का होईना वन मजुरांना शासकीय कार्यालयांमध्ये वापरले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहे. १५ ते २० वर्ष होऊनही अभयारण्याबाहेर निघण्याची संधी मिळत नसल्याने वन कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अभयारण्य कर्मचारी वर्षानुवर्षे बदलीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: February 27, 2015 1:40 AM