शेतकऱ्याचे धाडस : नावीन्यपूर्ण उपक्रमाने वेधले लक्ष
महागाव : परंपरागत शेतीला बगल देत भविष्यातील २५ वर्षे समोरचा विचार करून शेतीत नवा बदल घडवून आणण्याचे धाडस तालुक्यातील सवना येथील शेतकऱ्याने केले आहे. गजानन चेलमेलवार यांनी चंदन शेतीचा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.
यापूर्वी त्यांनी मोसंबी, टरबूज आणि भाजीपाला पीक घेतले. कापूस, सोयाबीन हे पीक वगळून काही तरी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले. तीन वर्षांपूर्वी ५०० चंदनाची रोपटी त्यांनी शेतात लावली आहेत. पाहता-पाहता चंदनाची झाडे आता १० ते १५ फुटांपर्यंत उंच झाली आहेत.
चंदनाच्या झाडांसोबतच त्यांनी मिली डुबिया जातीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. एकमेकाला पूरक असलेली ही झाडे आता नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर घालत आहेत.
चंदनाच्या झाडांचे संगोपन अतिशय जोखिमपूर्ण आहे. याची कल्पना असूनही चेलमेलवार यांनी ती पत्करली. चंदनाच्या झाडांची परिपक्वता अजूनही सुरू झालेली नाही. झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांचा प्लॅन तयार आहे.
परप्रांतीय चंदन तस्कर आणि ते वापरात आणत असलेली आधुनिक मशिनरी पाहता, चंदनाच्या झाडाला त्या तुलनेमध्ये संरक्षण देणे गरजेचे असल्याचे चेलमेलवार यांनी सांगितले.
बॉक्स
ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण
चंदनाच्या झाडाला तार कुंपण, बांबूचे कवच, पाळीव श्वानांचा फौजफाटा व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. अलीकडे चंदनाच्या शेतीला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही चंदनाची बाग गावापासून काही अंतरावर आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून या बागेमध्ये आपल्या आठवणींना उजाळा देत वेळ घालवत असतात.