लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव सांगळे यांना रविवारी अमोलकचंद महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत हरविल्याची खंत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. अनेकांना अश्रू अनावर झाले.श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माणिकराव भोयर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए. प्रकाश चोपडा, माजी आमदार कीर्ती गांधी, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, प्रा. डॉ. रमाकांत कोलते आदी उपस्थित होते.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माणिकराव भोयर म्हणाले, सांगळे सर माझे जवळचे मित्र होते. ते गेल्याचे वृत्त कळल्यानंतर माझा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या अंगी असलेल्या सेवाभाव या गुणाने मी भारावून गेलो. त्यांचे मदतीचे कार्य मोठे होते. प्रेमळ स्वभाव आणि मदत करण्याच्या वृत्तीने ते अनेकांना हवेहवेसे वाटत होते.विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, शंकरराव सांगळे यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय राहिले आहे. प्रत्येकासाठी ते मोठा आधार होते. माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले, सांगळे सर सकारात्मक ऊर्जेचे, प्रगाढ अभ्यास असणारे व्यक्तिमत्व होते. माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांनी अब्दुल कलामांच्या व्यक्तिमत्वाची जोड शंकरराव सांगळे यांना दिली. तर माजी आमदार कीर्ती गांधी यांनी सांगळे सर सर्वांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे व्यक्तिमत्व असल्याचा उल्लेख केला. अखिल भारतीय महिला काँग्रेस कमेटीच्या सचिव संध्याताई सव्वालाखे यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक उर्जेचा स्त्रोत असल्याचे मत व्यक्त केले.लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा म्हणाले, सांगळे सर म्हणजे तरूणातील तारूण्य, बालकातील बालक आणि आबालवृद्धातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व होते. त्यांना आयुष्यात कधी दु:खी पाहिले नाही. त्यांच्या कामात सदैव उत्साह असायचा. प्रा. डॉ. सागर जाधव यांनी खास सांगळे सरांसाठी रचलेली ‘मी मुसाफिर जिंदगीचा मीच मृत्यूला हरवून गेलो’ ही कविता श्रद्धांजली सभेत सादर केली. डॉ. रमाकांत कोलते यांना सरांबद्दल बोलताना भावना अनावर झाल्या. जगावे असे की बागेतले फुल व्हावे, अशा पद्धतीने सर जगले. त्यांनी सर्वांना चांगलेच मार्गदर्शन केल्याचे मत त्यांनी नोंदविले.डॉ. टी. सी. राठोड यांनी घरातील एक सदस्य हरविल्याची खंत व्यक्त केली. अमर दिनकर यांनी मार्गदर्शक शिक्षक हरविल्याचे मत नोंदविले. नुटाच्या वतीने प्रा. डॉ. विवेक देशमुख, पांढरकवडा शहराच्या वतीने माजी नगराध्यक्ष शंकर बढे यांनी मनोगत व्यक्त केले. अमोलकचंद महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य आर.ए. मिश्रा, पुसद शहराच्या वतीने प्राचार्य पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भास्कर भानारकर यांनी आझाद गणेश मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. जीवन पाटील, प्रा. दिनकरराव वानखडे, प्रा. न. मा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. काशिनाथ लाहोरे यांनी केले. यावेळी शंकरराव सांगळे यांचे चिरंजीव राहुल सांगळे, अर्चना सांगळे आणि मिनल नागरे उपस्थित होत्या. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी शिक्षण सभापती शिवाजी राठोड, जाफर खान, प्रताप पारसकर, कुलभूषण तिवारी, विजय देशमुख, अविनाश शिर्के, प्रकाश मिसाळ आणि आनंद उगलमुगले आदी उपस्थित होते.
सांगळे सर सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:28 PM
विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव सांगळे यांना रविवारी अमोलकचंद महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ठळक मुद्देमान्यवर गहिवरले : अमोलकचंद महाविद्यालयात श्रद्धांजली सभा, आठवणींना उजाळा