किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : घरी गरिबी. शिक्षण केवळ दहावीपर्यंतच. पण कोणताही प्रश्न विचारा, त्यांच्या ओठावर उत्तर तयार मिळेल. जगातल्या महत्त्वाच्या पाच हजार लोकांचे वाढदिवस, वर्षातल्या ३६५ दिवसांचे महत्त्व ते एका क्षणात सांगतात. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षण न घेताही ते आज ‘महाराष्ट्राचे गुगल’ म्हणून ओळखले जातात. स्मरणशक्तीच्या या बादशहाचे नाव आहे, संजय वामन पाटील.नेर येथील ‘स्नेहआधार’ या शेतकरी मुलांच्या शाळेत त्यांनी भेट दिली, त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपल्या स्मरणशक्तीचे गुपित सांगितले. जगभरातील महत्त्वाच्या पाच हजार व्यक्तींचे जन्मदिनांक त्यांच्या स्मरणात आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुमारे दोनशेच्यावर दिनविषेश त्यांच्या ओठांवर आहेत. आज धावपळीच्या जीवनात अनेकांना विसरण्याची सवय लागली. लोक आठवणी जपण्यासाठी मोबाईल, लॅपटॉपचा वापर करतात. मात्र जळगावचे संजय पाटील ‘गुगल’ची भूमिका बजावतात.जळगाववरून २५ किलोमीटर असलेले साधखेडा हे संजय वामन पाटील यांचे गाव. चावलखेडा येथील निळकंठेश्वर शाळेत ते दहावीपर्यंत शिकले. हलाकीची परिस्थिती असल्याने लहान वयापासून त्यांनी दूध विक्री व इतर किरकोळ कामे करत शिक्षण घेतले. याच दरम्यान वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना आपल्या स्मरणशक्तीची जाणीव झाली. मग त्यांनी भरपूर वाचन करून स्मरणशक्ती वाढवली. आता ते हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणूनही काम करतात.संजय यांनी दररोज जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन, मनन, चिंतन केले. झोपण्यापूर्वी ते मनातल्या मनात ३६५ दिवसांचे महत्त्व व पाठांतर करतात. ते लोकमत नेहमी वाचतात. विविध लेख सामान्यज्ञान, व्यक्तिमत्त्वे यांचा ते अभ्यास करतात. एकाग्रता हेच स्मरणशक्तीचे स्त्रोत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावेळी स्नेहआधारच्या प्रमुख कांचन कांबळे, निसर्गप्रेमी डॉ. अशोक जैन, नीलेश वाहणे, प्रदीप कांबळे आदींची उपस्थिती होती.आता तयारी जागतिक विक्रमाचीआपली स्मरणशक्ती जास्तीत जास्तीत वाढवून भविष्यात लिम्का बुक आॅफ रेकार्ड व गिनीज बुकमध्ये आपली नोंद व्हावी, ही संजय पाटील यांची अपेक्षा आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे, त्यादृष्टीने शैक्षणिक संस्थेत कार्यशाळा घेण्यासाठी ते कष्ट घेत आहेत.आपण मनात हार ठेवली तर हारणारच. जिंकण्याची तयारी ठेवा. जीवनात ‘नाही’ या शब्दाला महत्त्व देऊ नका. आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. केवळ ती करण्याची जिद्द ठेवा.- संजय पाटील, जळगाव
दहावी पास संजय ‘महाराष्ट्राचा गुगल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:08 PM
घरी गरिबी. शिक्षण केवळ दहावीपर्यंतच. पण कोणताही प्रश्न विचारा, त्यांच्या ओठावर उत्तर तयार मिळेल. जगातल्या महत्त्वाच्या पाच हजार लोकांचे वाढदिवस, वर्षातल्या ३६५ दिवसांचे महत्त्व ते एका क्षणात सांगतात.
ठळक मुद्देसंजय पाटील : कोणताही प्रश्न विचारा, उत्तर तयारच, स्मरणशक्तीचा बादशाह