पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर गेले पंधरा दिवस माध्यमांपासून दूर असलेले राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंगळवारी २३ फेब्रुवारीला पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या पुढे येत आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सहपरिवार दर्शन घेणे व त्यानंतर यवतमाळात कोरोनाची आढावा बैठक घेणे असा त्याचा मंगळवारचा अधिकृत कार्यक्रम आहे.
संजय राठोड हे सकाळी ९ वाजता यवतमाळातून शासकीय वाहनाने सहपरिवार पोहरादेवीकडे रवाना होणार आहेत. तेथे ११.३० वाजता पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर एक तास थांबणार आहेत. दुपारी १ वाजता तेथून दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे दर्शनासाठी येणार आहेत. तेथेही त्यांचा एक तासाचा वेळ राखीव राहणार आहे. त्यानंतर ते मोटारीने यवतमाळकडे रवाना होतील. पोहरादेवी येथे शिवसेनेचे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार असल्याचेही समजते. त्यासाठीच सोमवारी यवतमाळातून किती कार्यकर्ते, किती वाहने न्यायची याबाबत नियोजन झाले. तर यवतमाळ येथे दुपारी ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यात ते जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
दरम्यान, मंगळवारी ना. संजय राठोड हे पोहरादेवीला जाणार असल्याचे वृत्त कळल्याने सोमवारीच त्यांच्या बंगल्यापुढे पत्रकारांनी गर्दी केली होती. थेट नागपूर-मुंबईतील माध्यम प्रतिनिधींनी ना. राठोड यांच्या यवतमाळातील बंगल्यापुढे अख्खा दिवस घालवला. मात्र ना. राठोड यांचा बाईट मिळणे तर दूरच; पालकमंत्र्यांची साधी झलकही कुणाला दिसली नाही.