यवतमाळ – राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आलिशान बसचा प्रवास अखेर यवतमाळरांना आजपासून साध्य झाला. यवतमाळ येथून शिवशाही बससेवा सुरू करावी यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने मांडलेल्या भूमिकेला आज यश आले. यवतमाळ आगारातून आज सकाळी 10 वाजता शिवशाही बसच्या यवतमाळ-अमरावती या पहिल्या फेरीचा शुभारंभ ना. संजय राठोड यांच्याहस्ते फीत कापून झाला. यावेळी नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पराग पिंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यवतमाळ येथून लांब पल्याच्या अनेक बसेस सुटतात. दररोज शेकडो प्रवासी नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई प्रवास करतात. त्यांच्या सोईसाठी शिवशाही ही आरामदायी बससेवा यवतमाळ येथून सुरू करावी, अशी आग्रही भूमिका ना. संजय राठोड यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने मांडली. गेल्या आठवड्यात ना. रावते यवतमाळ येथे आले असता यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनीही त्यांना व ना. संजय राठोड यांना यवतमाळ येथून शिवशाही बससेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. या निमित्ताने ना. राठोड यांनी ना. रावते यांच्याकडे पुन्हा हा विषय लावून धरला. तेव्हा ना. रावते यांनी या निवेदनावर तत्काळ अंमलबजावणी करून यवतमाळ जिल्ह्यात सहा शिवशाही बस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार सध्या यवतमाळला तीन शिवशाही बसेस प्राप्त झाल्या. यातील दोन बस यवतमाळ-पुणे मार्गावर तर एक बस पुसद-औरंगाबाद मार्गावर धावरणार आहे. आणखी तीन बसेस लवकरच प्राप्त होणार असून या बसेसही लांब पल्ल्याच्या मार्गावर चालविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. आज प्रायोगिक तत्वावर यवतमाळ-अमरावती मार्गावर पहिली शिवशाही बस सोडण्यात आली. लवकरच अमरावती, नागपूर या मार्गावरही शिवशाही बसेस सोडण्यात येतील, असे यावेळी ना. राठोड यांनी सांगितले. प्रवाशांनी आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाहीसह इतर बससेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी ना. राठोड यांनी केले. यावेळी बसच्या आत फेरफटका मारून ना. राठोड यांनी अत्याधुनिक सुविधांची पाहणी केली व बसमधील प्रवासी, चालक व वाहक यांना पहिल्या शिवशाही प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्य परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक अशोक वरठे, विभागीय वाहतूक अधिकारी जोशी, आगार व्यवस्थापक डफडे, यंत्र अभियंता अविनाश राजगुरे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक गजानन इंगाेले, व्यापारी आघाडी प्रमुख प्रवीण निमोदिया, शिवसेना पदाधिकारी, एसटी अधिकारी, कर्मचारी, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.