१५ लाख मंजूर : जॅकवेलमध्ये पाणी आणण्यासाठी डोहात नवीन पंप बसविणारपुसद : तालुक्याचे वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना शनिवारपासून ठप्प झाली असून, गावागावात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. यावर तातडीची उपाय योजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी १५ लाख रुपये मंजूर केले आहे. यातून जॉकवेलपर्यंत पाईप लाईनने पाणी आणून माळपठारात वितरित केले जाणार आहे. लवकरच माळपठारावरील नागरिकांना पाणी उपलब्ध होणार आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भागासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेसाठी इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जॅकवेल आहे. परंतु जॅकवेल परिसरातील पाणी आटल्याने विहीर कोरडी पडली आहे. परिणामी शनिवार १४ मे पासून या योजनेचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यातून ४० गावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. यावर तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी १४ ला ९६ हजार ३७० रुपये मंजूर केले. या योजनेतून डोहातून जॅकवेलपर्यंत पाणी आणले जाणार आहे. ७०० मीटर लांबीची पाईपलाईन आणि अॅप्रोच कॅनाल खोदला जाणार आहे. दोन पंपाच्या माध्यमातून प्रती तास ८० ते ९० हजार लिटर पाणी जॅकवेलमध्ये आणून ते वितरित केले जाणार आहे. गुरूवारी एका पंपाचे काम पूर्ण झाले असून, दोन दिवसात दुसरा पंपही कार्यान्वित केला जाईल, त्यातून माळपठारावरील पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे. (प्रतिनिधी)पाणीकराचे तीन कोटी थकितमाळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागरिकांकडे तब्बल तीन कोटी रुपये थकित आहेत. यावर्षी आमदार मनोहरराव नाईक यांच्या पुढाकारातून बैठका घेऊन पाणीकराबाबत जनजागृती करण्यात आली. त्यामुळे जवळपास ३० टक्के वसुली झाली आहे. १०० टक्के वसुली झाल्यास या भागाला सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो. परंतु त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलपासून ३० मीटरपर्यंत पाणीच नाही. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांनी निधी मंजूर केल्याने डोहातून पाणी आणून जॅकवेलमध्ये सोडले जाईल आणि पाणी गावागावात पोहोचेल. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण उपाययोजना करीत आहे. - एम.टी. परमेश्वर, उपविभागीय अभियंता जीवन प्राधिकरण, पुसद.
माळपठार योजनेला संजीवनी
By admin | Published: May 20, 2016 2:07 AM