कुटुंब शस्त्रक्रिया प्रकरण : जिल्हा शल्यचिकित्सकांची समिती चौकशी करणार यवतमाळ : पुसद तालुक्यातील बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचे आतडे कापले गेल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने तक्रार दिली असून पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वात समिती गठित करण्यात येणार आहे. पुसद तालुक्यातील बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात शस्त्रक्रिया झालेल्या शारदा वाघू काळे रा. बारा ता. उमरखेड हिचा मृत्यू झाला. तर अरुणा प्रदीप चव्हाण आणि वंदना अशोक देवकते यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. यवतमाळ येथे शारदा काळे हिचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करताना आतडेच कापल्याचे पुढे आले. तसेच उपचार घेत असलेल्या अरुणा आणि वंदनाचेही शस्त्रक्रिया दरम्यान आतडे कापले गेल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर वेळेत उपचार झाल्याने सध्या प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वात समिती गठित करण्यात आली आहे. त्या स्त्री रोग तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे. पुसदचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर भोंगाडे व बेलोरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील सातुरवार यांच्याकडून शिबिर घेताना प्रचंड चुका झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. नवशिक्या डॉक्टरकडून शस्त्रक्रिया शिबिर घेतले जात असताना वरिष्ठांना कोणतीच माहिती दिली नाही. तसेच शुक्रवारी महिलेची गंभीर प्रकृती झाल्यानंतरही वरिष्ठांकडून माहिती दडवून ठेवण्यात आली. महिलांवर शस्त्रक्रिया करताना त्यांच्याकडून चूक होत असल्याचे एका आरोग्यसेवकाच्या निदर्शनास आले होते. त्याने शिबिर थांबविण्याची विनंती केली. मात्र डॉक्टरांनी ऐकले नाही. त्यातच एका महिलेला प्राणाला मुकावे लागले. या गंभीर प्रकरणाची दखल प्रशासनाने घेतली असून आरोग्य उपसंचालकांनी त्याचा अहवाल मागितला आहे. चौकशी अहवाल प्राप्त होताच दोनही डॉक्टरांवर फौजदारी कारवाई केली जाईल. सध्या शारदा काळे यांचा भाऊ विश्वंभर राऊत यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ती चौकशीत असून अहवाल येताच गुन्हे दाखल करणार असल्याचे ठाणेदार बाळासाहेब जाधवर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी) प्रथमदर्शनी या प्रकरणात दोनही डॉक्टरांचा दोष दिसून येतो. चौकशी अहवालानंतर दोषी असलेल्या प्रत्येकावर प्रशासकीय कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहे. ही अक्षम्य चूक आहे. मृत महिलेच्या कुटुंबियाला शासनाकडून दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. - डॉ.के.झेड. राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी
आतडे कापल्यानेच शारदाचा मृत्यू
By admin | Published: January 23, 2017 1:00 AM