जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या ‘आम्ही यवतमाळकर, मात करू कोरोनावर’ या मोहिमेंतर्गत तालुक्यात ग्रामस्तरावर व पालिकास्तरावर शिक्षक घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत. यात मास्कचा सतत वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यास त्वरित चाचणी करणे, ४५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांचे लसीकरण करणे याबाबत तहसीलदार पूजा माटोडे, मुख्याधिकारी अमोल माळकर, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, गटशिक्षणाधिकारी प्रवीण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांकडून जनजागृती केली जात आहे.
शहरातील सर्व व्यावसायिक स्वत:हून कोरोना तपासणी करून आपल्या ग्राहकांना सुरक्षित सेवा देण्यास पुढे सरसावत आहेत. ग्रामीण भागात ग्राम कोरोना नियंत्रण समित्यासुद्धा कार्यान्वित करण्यात आल्या. तहसील, नगर परिषद, आरोग्य विभाग, पोलीस, पंचायत समिती यांचे संयुक्त पथक निर्माण करण्यात आले. पोलीस ठाणे, बस स्थानक, ग्रामीण भागात नियमित कोरोना तपासणी शिबिरे या पथकांच्या माध्यमाने घेतली जात आहेत. कोविड येथील केअर सेंटरमध्ये नियमितपणे या शिबिरांशिवाय कोरोना तपासणी केली जात आहे.
ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व स्वयंसेवी संस्था, तालुक्यातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक यांनी स्वत:च्या परीने कोरोनामुक्तीच्या लढाईत सहकार्य करण्याचे आवाहन तालुका कोरोना नियंत्रण समितीने केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक बाबींकरिता केवळ कुटुंबातील एकाच व्यक्तीने दिवसातून फक्त एकदाच घराबाहेर पडावे आणि आपल्या कुटुंबाला व तालुक्याला कोरोना विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन समितीने केले आहे.
बॉक्स
४५ वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करावे
तालुक्यातील विविध स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित नागरिक यांनी तालुक्यातील जनतेला आपला परिवार व समाज सुरक्षित ठेण्याच्या दृष्टीने कोरोना तपासणी व ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोरोना लसीकरण शिबिरात जाऊन लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. तालुका कोरोनामुक्त ठेवण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका कोरोना नियंत्रण समिती अध्यक्ष पूजा माटोडे यांनी केले आहे.