घाटंजी : तालुक्यातील कुर्ली येथील एका शिक्षिकेने तीन शिक्षकांसह आजी व माजी सरपंचाविरुध्द तक्रार देऊन गुन्हे दाखल केले. मुळात ती तक्रार खोटी असून आकसापोटी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी सुमारे २५० ग्रामस्थ व पालकांसह २३ शिक्षक संघटनांच्या समन्वय महासंघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी व पारवा पोलिसांकडे केली आहे.
फिर्यादी शिक्षिका मुख्याध्यापक असताना शाळेच्या आर्थिक व्यवहारात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून त्या प्रशासकीय व आर्थिक कारवाईस पात्र ठरतात, असा अहवाल चौकशी समितीने वरिष्ठांना दिला. त्यामुळे संभाव्य कारवाईच्या भीतीने व ज्यांनी याबाबत तक्रार केली, त्यांच्यासह तीन शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आल्याच दावा निवेदनातून करण्यात आला.
सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी २५० नागरिक व पालकांनी केली आहे. आदिवासी संघटना, २३ शिक्षक संघटनांनीही तीच मागणी केली.