ऑनलाईन लोकमतयवतमाळ : चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करीत आता गुणवत्तापूर्ण कामावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आदर्शगाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी यवतमाळात केले.रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित सरपंच मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कृषी विभाग, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होेते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री मदन येरावार होते. तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार डॉ. अशोक उईके, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार, प्रकल्प संचालक पाटील आणि सर्व उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.पोपटराव पवार म्हणाले, गावासाठी योजनांचा महापूर आहे. राज्यात ८२ टक्के भूभाग वरच्या पाण्यावर होणाºया सिंचनावरच विसंबून आहे. गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजकीय, प्रशासकीय बदलासोबतच समाजव्यवस्था बदलण्याची गरज आहे. त्यासाठी परावलंबी विचार सोडावा लागेल. सिंचनातून गावाला समृद्ध करण्यासाठी पाणी आडवावे लागेल. उपलब्ध पाण्यातून कुठले पीक घ्यायचे याचा विचार करावा लागेल. बाजारात कुठल्या वस्तू विकल्या जातात, याचा विचार करूनच पीक पद्धतीचे नियोजन करावे. समाज तमाशाने बिघडत नाही. कीर्तनाने सुधारत नाही. त्यासाठी स्वत:ची तयारी असावी लागते. तर मी सरपंच का झालो, याचा विचार मनात येणे गरजेचे आहे. चांगल्या कामासाठी आपण पुढे आलो तर गाव आपल्याला मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.भविष्यात शाश्वत शेती आणि शाश्वत आनंदाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यावरील शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसून काढण्याचे आवाहन यावेळी सरपंचांना करण्यात आले.यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्यक्ष काम करून स्वत:च्या कल्पकतेतून गावाचे चित्र बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंचायत विकासाचा पाय गाव आणि सरपंचाचे पद असल्याचे ते म्हणाले.उद्घाटनपर भाषणात किशोर तिवारी म्हणाले, गावामध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. कृषी संकटावर मात करण्यासाठी विविध प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकांना भाषणाची नव्हे तर कृतीची गरज आहे. यावेळी शास्त्रज्ञांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी केले. तर सूत्रसंचालन कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांनी केले.
सरपंचांनो, गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:27 PM
चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी मिळाली आहे.
ठळक मुद्देपोपटराव पवार : जलयुक्त शिवारअंतर्गत कृषी विभागाचा सरपंच मेळावा