२०९ गावे : डीआरडीएच्या बैठकीत अभियानाचे नियोजनयवतमाळ : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गावखेड्यातही जलसाक्षरतेचा अभाव आहे. आता यवतमाळ जिल्हा परिषदेने पाणी साठवा, गाव वाचवा हे अभियान हाती घेतले असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पावसाचा जमिनीवर पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर पाणी साठवा, गाव वाचवा हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानांतर्गत प्रथम टप्प्यात जिल्ह्यातील नऊ गावे निवडण्यात आली आहे. विविध विभागाच्या सहकार्याने या गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अंमलबजावणीसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुळकर्णी, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विनय ठमके, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही. वड्डेवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक वालदे आदींची उपस्थिती होती.पावसाचा प्रत्येक थेंबन्थेंब अडवून जिरविण्यासाठी हे अभियान दिशादर्शक ठरणार आहे. भूजल पातळी वाढविण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मजबूत व्हावे, यासाठी ग्रामपातळीवर जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात येणार आहे. विविध आठ शासकीय विभागांच्या योजनांची यासाठी एकत्रिकरण केल्या जाणार आहे. या अभियानात विशेष कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अभियानासाठी जिल्ह्यातील २०९ गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये यवतमाळ तालुक्यातील ११, बाभूळगाव १०, मारेगाव १६, वणी १५, घाटंजी १३, राळेगाव १२, नेर ११, आर्णी ११, कळंब १८, केळापूर १६, दारव्हा १३, दिग्रस १२, उमरखेड १४, महागाव ११, पुसद १० तर झरी तालुक्यातील १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या २०९ गावातील सरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानामुळे जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामाला गती येणार असून गावे पाण्याच्या स्त्रोतासाठी लक्षणीय योगदान देणार आहे. (शहर प्रतिनिधी)
‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान
By admin | Published: July 07, 2014 12:09 AM