नऊ तास तांडव : ट्रक, दुचाकींसह ७० लाखांचे प्लायवूड खाकयवतमाळ : येथील नेहरूनगरातील सॉ मिलला पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात ट्रक, दुचाकी यासह सुमारे ७० लाख रुपयांचा प्लायवूड आदी साहित्य भस्मसात झाले. तब्बल नऊ तास धुमसत असलेल्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ४० बंब कामी आले. पुलगाव येथील सैन्यदलाच्या बंबालाही पाचरण करण्यात आले होते. आगीच्या या रौद्ररूपाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सदर आग शॉट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यवतमाळ शहरातील नेहरूनगर परिसरात देवीप्रकाश अग्रवाल (रा. राजेंद्र नगर) यांची भगवती सॉ मिल आहे. विस्तीर्ण अशा सॉ-मिलमध्ये शेकडो टन लाकूड, प्लायवुड आणि इतर साहित्य ठेवून होते. मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. पहाटेची वेळ असल्याने आग तात्काळ लक्षात आली नाही. मात्र या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. धुराचे लोटच्या लोट निघत होते. या आगीची माहिती तात्काळ यवतमाळच्या अग्नीशमन दलाला देण्यात आली. चार बंब तात्काळ दाखल झाले. तसेच आगीची तीव्रता पाहून पुलगाव येथील सैन्यदलाच्या बंबालाही पाचारण करण्यात आले. ४० बंब आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. त्यानंतर तब्बल नऊ तासाने आगीवर नियंत्रण मिळविता आले. मात्र धुराचे लोट निघतच होते. या आगीत प्लायवूड, अॅल्युमिनीअम आणि स्टील फ्रेम या सोबतच ट्रक, दोन दुचाकी तसेच लाकूड भस्मसात झाला. आगीची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या सॉ मिललाच लागून वसाहत आहे. आगीमुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकांनी आपल्या घरातील ज्वलनशील पदार्थ आणि स्वयंपाकाचे गॅस सुरक्षी तस्थळी हलवीले होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळविल्याने या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे कळू शकले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉट सर्किटने आग लागल्याचे सांगितल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
सॉ मिलला भीषण आग
By admin | Published: November 04, 2014 10:46 PM