जीवन प्राधिकरण : खोट्या अहवालाचे बिंग फुटले विलास गावंडे - यवतमाळधरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यकारी अभियंत्यांनीच ठाणे मुख्यालयात कागदावर रंगविले आहे. एवढेच नव्हे तर पाणीटंचाईचे मूळ ठरलेल्या वादग्रस्त उपअभियंत्याला चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्रही देण्यात आले आहे. कार्यकारी अभियंत्याचा हा खोटा अहवाल फुटल्याने प्राधिकरणात खळबळ निर्माण झाली आहे. यवतमाळ शहराच्या सर्व भागात पाण्यासाठी टाहो सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक भागातील मोर्चे प्राधिकरणावर धडकले. एवढेच नव्हे तर अधिकार्याच्या अंगावर शाई फेकण्याचा आणि ‘गांधीगिरी’चाही प्रकार घडला. असे असताना प्राधिकरणाच्या येथील कार्यकारी अभियंत्याने मात्र दारव्हेकर यांची चांगलीच पाठराखण केली आहे. केवळ २0 दिवसात त्यांनी जणू ‘चमत्कार’ घडविल्याचा कांगावा केला गेला. प्राधिकरणाच्या ठाणे मुख्य अभियंत्यांना तसे पत्रही पाठविले. दारव्हेकर यांनी प्रकल्पातील अशुद्ध पाणी (मृतसाठा) मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्याच बळावर त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रात जणू पाण्याची गंगा अवतरल्याचा देखावा निर्माण केला. टाकींमध्ये पुरेसे पाणी साठविले जात आहे, परिणामी प्राधिकरणावर नागरिकांचे मोर्चे थांबल्याचेही वरिष्ठांना कळविले गेले. दारव्हेकर यांचे ‘कौतुक’ एवढय़ावरच थांबले नाही तर शहराच्या पाणीपुरवठय़ाचे वितरण ते व्यवस्थितपणे करत असल्याचे प्रशस्तीपत्रही दिले गेले. हे पत्र आणि वास्तव स्थिती पाहून कुणालाही धक्का बसेल. या पत्राने प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किती खोटारडे आहे हे सिध्द झाले आहे. वास्तविक यवतमाळ शहरातील जनतेला आजही तीन ते चार दिवसांपर्यंत पाणी मिळत नाही. ‘सारी रात जागली, हाती नाही लागली’ अशी अवस्था आहे. असे असतानाही वरिष्ठांनी दारव्हेकरांचा एवढा उदोउदो करण्यामागील ‘रहस्य’ अद्याप कुणालाही उलगडलेले नाही. दारव्हेकरांनी वरिष्ठांना ‘खूष’ करून तर हे पत्र मिळवून घेतल नाही ना, अशी शंका प्राधिकरणात व्यक्त केली जात आहे.
म्हणे, पाणी प्रश्न मिटला, मोर्चेही थांबले
By admin | Published: June 09, 2014 12:09 AM