लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे १०० पेक्षा अधिक ग्राहक सेवा केंद्र नव्या आर्थिक वर्षापासून बंद पडले आहेत. त्यामुळे जनधनचे खातेदार, विद्यार्थी, रोहयोचे मजूर आणि पेन्शनर्स मंडळी यांना आपले पैसे काढता येणे कठीण झाले आहे. तर केंद्र चालकांवरही बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची नाळ राष्ट्रीयकृत बँकांशी जोडण्यासाठी हे केंद्र उघडण्यात आले होते. मात्र बँकेच्या मुंबई कॉर्पोरेट कार्यालयाने या केंद्रांचे कोड १ एप्रिलपासून आकस्मिकपणे बंद केले. त्यामुळे ग्राहक सेवा केंद्रातून कोणतेही व्यवहार होणे अशक्य झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका जनधनच्या खातेदारांना बसत आहे. शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांतील छोट्या रकमा, रोहयोच्या मजुरांची मजुरी, निराधारांचे मानधन, पेन्शनर्सचे निवृत्तीवेतन अशा ग्राहकसेवा केंद्रातून विड्राल करणे सोयीचे जाते. स्टेट बँकेच्या व्यवसाय प्रतिनिधींमार्फत ही योजना ग्रामीण भागात पोहोचली. अटल पेन्शन, जीवन ज्योती, सुकन्या व्यक्तिगत अपघात विमा, शिष्यवृत्ती, सामाजिक अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती ग्राहकांना मिळत असताना गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद पाडण्याचा घाट घातला जातोय.जनधन खात्यात व्यवहार वाढले असताना बँकेने आॅक्टोबरपासून राज्यातील साडेपाच लाख खाती ‘होल्ड’ केली आहेत. आता १ एप्रिलपासून ग्राहकसेवा केंद्रांचे कोडच बंद करण्यात आल्याने ग्राहकांची मोठी हेळसांड होत आहे. यवतमाळच्या आर्णी रोडवरील केंद्रात रोज ४० ग्राहक येऊन परत जात आहेत.बुधवारी येथे आलेला श्याम तेलेवार हा विद्यार्थी म्हणाला, मी मूळचा किनवटचा माझे खातेही तेथेच आहे. पण आता मी यवतमाळात शिकतोय. माझ्या खात्यात मेसचे ६०० रुपये जमा झाले, ते विड्राल करायचे आहे. माझ्याकडे एटीएम नाही. पण ग्राहकसेवा केंद्र बंद असल्याने आता मला ते पैसे काढता येत नाही. असे अनेक मजूर, पेन्शनर्स या ठिकाणी येऊन परत जात आहेत. याचा मन:स्ताप सहन करावा लागतो.मुंबईत करणार उपोषणमहाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, राज्यस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातील ग्राहक सेवा केंद्रांचेही कोड बंद करण्यात आले आहे. याविरोधात व्यवसाय प्रतिनिधी कल्याणकारी संघटना मुंबईत आंदोलन करणार आहे. येत्या ९ एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानात करस्पॉन्डंट वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या उपोषणात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आदी राज्यातूनही प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
‘एसबीआय’चे १०० ग्राहकसेवा केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 10:01 PM
जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे १०० पेक्षा अधिक ग्राहक सेवा केंद्र नव्या आर्थिक वर्षापासून बंद पडले आहेत. त्यामुळे जनधनचे खातेदार, विद्यार्थी, रोहयोचे मजूर आणि पेन्शनर्स मंडळी यांना आपले पैसे काढता येणे कठीण झाले आहे. तर केंद्र चालकांवरही बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
ठळक मुद्देकोडच नाही : जनधनचे खातेदार संकटात, पेन्शनर्सची अडचण