नवा प्रयोग : झाडगावच्या शेतकऱ्याने लावली १५०० चंदनाची झाडे व नर्सरीही फुलविलीके.एस. वर्मा राळेगावबहुतांश शेतकरी परंपरागत शेतीतच धन्यता मानतात. मात्र झाडगावचे ६७ वर्षीय शेतकरी बबनराव बापुराव राडे यांनी चंदनाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी तेही परंपरागत पीकच घेत होते. पण २००४ मध्ये लावलेल्या व योगायोगाने वाढलेल्या एका चंदनाच्या व दुसऱ्या रक्तचंदनाच्या झाडाच्या वाढीमुळे त्यांनी चंदनाच्या शेतीचाच ध्यास घेतला. २००९ पासून त्यांनी झरगड शिवारातील आठ एकरात सोयाबीन व तूर या पिकांसोबतच काठाकाठाने तब्बल १५०० चंदनाची झाडे लावली. तसेच चार हजार रोपांची नर्सरीही जोपासली आहे. त्यांचे बंधू वामनराव, तीन मुले अतुल, सचिन, अमित त्यांना मदत करतात. शेतीसाठी पूर्णवेळ देता यावा म्हणून शेतातच घर बांधले. तीन मजूर बारमाही कामावर ठेवले. एक बैलजोडी, एक ट्रॅक्टर व एक मळणीयंत्र त्यांच्या दिमतीला आहे. विहीर, स्प्रिंकलर आहे. मात्र कोणत्याही शासकीय योजनेचा राडे यांनी कधीच लाभ घेतला नाही. बबनराव राडे यांनी चिकू, आवळा, डाळिंब, गावरानी व पेवंदी आंबा, फणस, जांब, सीताफळ, लिंबू, पपई, मोसंबी, करवंद आदी फळझाडे, सिसम, शेवगा, सागवान, पिंपळ, वड, बेल, कवट ही झाडे, शिवाय चमेली, रातराणी, कन्हेर, अंबाडी ही फुलझाडेही जोपासली आहे. सात लाखांचे झाड२००४ मध्ये पहिल्यांदा लावलेल्या चंदनाच्या झाडाची उंची आज २५ फूट झाली आहे. गोलाई एक मीटर आहे. या झाडातून कमीत कमी ७० किलो चंदन मिळणार अशी राडे यांना आशा आहे. चंदनाचा आजचा बाजारभाव १० हजार रुपये किलो आहे. त्यानुसार हे एकच झाड आज सात लाखांचे आहे. या शिवाय झाडाच्या साली, फांद्या, लाकडे, खोडपाला, बीज आदी प्रत्येक गोष्टीला औषधी, साबण, धार्मिक कार्य आदींसाठी मागणी आहे. चंदनाची झाडे फुलोऱ्यावर आली असून त्यातून बीज निघतात. बिजातून सुवासिक तेल, औषधीसह अनेक उपयुक्त बाबी मिळतात. या बियांना जमिनीत पुरले तर रोपे तयार होतात. त्यातूनच राडे यांनी नर्सरी यशस्वी केली आहे. चंदनाची रोपे लावल्यानंतर त्याला काठीचा आधार द्यावा लागतो. या शिवाय खत, फवारणी व देखभालीची गरज नसल्याचे राडे यांनी सांगितले. राडे यांच्याप्रमाणेच बहुभूधारक किंवा अल्पभूधारक शेतकरीही चंदनाचा प्रयोग यशस्वी करू शकतात. १०-१५ वर्षानंतरची सुरक्षित गुंतवणूक समजून हा प्रयोग करण्याचे आवाहन राडे यांनी इतर शेतकऱ्यांना केले आहे. झाडगाव व परिसरातील अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. वरूडच्या (जि.अमरावती) खालोखाल येथे संत्रा पीक घेतले जात होते. त्यामुळे या भागाची ओळख मिनी कॅलिफोर्निया अशी होती. कालांतराने संत्रा उत्पादन परवडेनासे झाल्याने आता येथे मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. सेलू (वर्धा), जळगाव भागाप्रमाणेच केळीचे उत्पादनही येथे घेतले जात आहे. पूर्ण शेतीच सागवानमय करण्याचे प्रयोगही अनेक शेतकऱ्यांनी केले आहे.
परंपरागत शेतीला चंदनाच्या झाडांतून यशाचा सुगंध
By admin | Published: September 19, 2015 2:26 AM